अहमदनगर

पोलिस पाटील भरतीला मुहूर्त सापडेना ; आदेश देऊन भरती प्रक्रिया रखडली

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दीड महिन्यांत पोलिस पाटलांची भरती प्रक्रिया राबवून अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वच सात उपविभागीय अधिकारी यांना दिले होते. आदेश देऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु अद्याप जिल्ह्यात भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही. कधी दुष्काळ, कधी मराठा आरक्षण तर कधी अधिकार्‍यांची उदासीनता आदी कारणामुळे भरती प्रक्रिया दहा वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 765 गावांचा कारभार पोलिस पाटलांविनाच सुरु आहे. स्वातंत्र्यापूर्वी पोलिस पाटलांची नियुक्ती वंशपरंपरेने होत होती. पाटलांच्या नावाने गावे ओळखली जात होती. स्वातंत्र्यानंतरही दोन अडीच दशके पोलिस पाटलांचा दबदबा सुरुच होता. त्यानंतर मात्र, पोलिस पाटलांचे महत्त्व कमी होत गेले.

1980 ते 85 दरम्यान, उपविभागीय अधिकारी हे पोलिस पाटलांची नियुक्ती करु लागले. त्यामुळे अनेक गावांत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती पोलिस पाटील झाले आहेत. कोल्हार भगवतीसारख्या गावात खर्डेंच्या जागी बर्डे पाटील झाले.
सन 2010 च्या आसपास पोलिस पाटलांची सरळसेवेने भरती होऊ लागली. त्यामुळे महिला देखील पोलिस पाटील म्हणून गावकारभार सांभाळू लागल्या आहेत. 2012 -13 या वर्षांत संगमनेर आणि श्रीरामपूर उपविभागीय अधिकार्‍यांनी पोलिस पाटील भरती केली होती. त्यानंतर दुष्काळ व इतर कारणामुळे राज्य सरकारने काही काळ भरती थांबवली. त्यामुळे पोलिस पाटलांच्या रिक्त जागांची संख्या वर्षागणिक वाढू लागली.

जिल्ह्यात पोलिस पाटलांची एकूण 1 हजार 385 मंजूर आहेत. सध्या 620 गावांत पोलिस पाटील आहेत. उर्वरित 765 गावांत पोलिस पाटलांअभावी गावकारभार सुरु आहे. पोलिस पाटलांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, यासाठी निवेदने, आंदोलने करण्यात आली. चार पाच वर्षांपूर्वी पोलिस पाटील पदांचा शासनाच्या तरतुदीनुसार बिंदूनामावली तपासणीचे काम उपविभागीय कार्यालयांकडून सुरु होते.
मध्यंतरी पोलिस पाटील पद भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, नगर, कर्जत, पाथर्डी व श्रीगोंदा -पारनेर या सात उपविभागीय तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रचलित शासन नियमानुसार बिंदूनामावली तपासणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करुन घेतली. तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देखील पाठविला.

त्यानुसार 16 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे मंजूर बिंदूनामावलीनुसार पदे भरण्यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांची बैठक घेतली. उपविभागीय स्तरावर कालबध्द कार्यक्रम तयार करुन दीड महिन्यात पोलिस पाटील पद भरती प्रक्रिया पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी उपविभागीय दंडाधिकारी यांना दिले होते. याबाबत 1 जुलै 2022 रोजी सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांना पत्र पाठविण्यात आले. 15 ऑगस्टपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप उपविभागीय कार्यालयांमध्ये भरतीबाबत कोणतीच कार्यवाही सुरु नसल्याचे चित्र आहे.

तीन महिन्यांपूर्वी पोलिस पाटील भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मराठा आरक्षणात बदल झाला. त्यामुळे बिंदूनामावलीत अडचणी आल्या आहेत.भरती प्रक्रियेबाबत लवकरच पुन्हा उपविभागीय अधिकार्‍यांची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे.
                                              -डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी

मराठा समाजाच्या आरक्षणामुळे बिंदूनामावली दोन तीनदा बदलावी लागली. त्यामध्ये वेळ गेला. आता पोलिस पाटील पद रिक्त असलेल्या गावांतून जातनिहाय लोकसंख्या उपलब्ध होताच आरक्षण प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानंतर लगेच भरतीची जाहिरात प्रसिध्द केली जाईल.

                                       -गोविंद शिंदे, उपविभागीय अधिकारी, शिर्डी.

तालुकानिहाय एकूण रिक्त जागा
श्रीगोंदा 34, पारनेर 108, कर्जत 33, जामखेड 23, पाथर्डी 109, शेवगाव 82, नगर 83, नेवासा 38, श्रीरामपूर 19, राहुरी 45, कोपरगाव 31, राहाता 18, संगमनेर 71, अकोले 71.

SCROLL FOR NEXT