अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : बालिकाश्रम रस्त्यावर सोमवारी रात्री (दि.19) ओंकार ऊर्फ गामा पांडुरंग भागानगरे (वय 24, रा.पंचपीर चावडी, माळीवाडा) या तरुणाची तलवारीने वार करून निघृण हत्या करण्यात आली. तर, शुभम पडोळे याच्यावरही तलवारीने वार झाल्याने तोही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर तिनही आरोपी नगरमधून पसार झाले. अद्यापि पोलिसांना हल्लेखोरांचे धागेदोरे मिळाले नाहीत. तिनही आरोपींचे मोबाईल घटना घडल्यापासूनच 'स्विचऑफ' आहेत.
गणेश केरुप्पा हुच्चे, नंदू बोराटे व संदीप गुडा अशी हल्लेखोरांची नावे आहेत. यातील गणेश हुच्चे याचा राजकीय नेतेमंडळीत नेहमीच वावर राहिलेले आहे. गणेश हुच्चेवर 2016 पुर्वीचे 7 गुन्हे तर नंदू बोराटे याच्यावर 2014 पर्यंतचे चार गुन्हे दाखल आहेत. मयत ओंकार ऊर्फ गामा भागानगरे व ओंकार रमेश घोलप, शुभम पडोळे, आदित्य खरमाळे हे मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रुबाब कलेक्शन दुकानाच्या समोर थांबलेले होते.
हुच्चे, बोराटे व गुडा हे तिघे दोन मोपेड दुचाकीवरून तिथे आले त्यांनी तलवारीने हल्ला चढविला. हल्ल्याची घटना 'सीसीटीव्ही'मध्ये कैद झाली आहे. मयत ओंकार हा खाली बसलेला असल्याने त्याच्यावर आरोपींनी तलवारीने सपासप वार केले त्यात त्याचा मृत्यू झाला. शुभम पडोळे या तरुणावरही वार केले. तर, मारहाणीच्या भीतीने ओंकार घोलप व आदित्य खरमाळे हे दोघे तिथून पळाले.
खबर्यांचे नेटवर्क व 'फिजिकल इन्व्हेस्टिगेशन'वर भर देऊन पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. एलसीबीचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके तपासात कार्यरत आहेत. एसपी राकेश ओला या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष ठेऊन आहेत.
अवैध धंद्यांची तक्रार केल्याने हुच्चे याने कोतवालीच्या आवारात येऊन धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर रात्री तलवारीने हल्ला केला. परंतु, या हत्याकांडाला भागानगरे, घोलप व हुच्चे यांच्यातील पूर्वीचे वादही कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
बालिकाश्रम रस्त्यावर ओंकार घोलप, मयत भागानगरे असल्याची माहिती हल्लेखोरांना कोणी पुरविली? याचीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, हल्लेखोरांना माहिती देणार्या काहींची नावेही पोलिसांनी निष्पन्न केल्याची माहिती आहे.
हेही वाचा