श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संगमनेर बस स्थानकातील वाढत्या चोर्या रोखण्यासाठी तत्कालीन पोलिस उपाधीक्षकांनी सुरू केलेल्या पोलिस चौकीत पोलिस थांबत नसल्याने ' बसस्थानक पोलिस चौकी शोभेचे बाहुले' मथळ्याचे वृत्त दै. पुढारीने प्रकाशित करताच शहराचे पो. नि. भगवान मथुरे खडबडून जागे झाले. बसस्थानक पोलिस चौकीत दोन पोलिसांसह एका होमगार्डची नियुक्ती केली. दरम्यान, प्रत्येक तासाला साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरु केली. यामुळे आता बस स्थानक परिसरात महिला प्रवाशांचे दागिने ओरबडण्यासह पुरुषांच्या पाकिटमारीला आळा बसणार आहे. वाढत्या चोर्यांना पायबंद घालण्यास मदत होणार आहे.
अ. नगर जिल्ह्यात सर्वात मोठे व विस्तृत असे बस स्थानक संगमनेर येथे साकारले. या बस स्थानकामध्ये पुणे, नाशिक, अ. नगर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई आदी महत्त्वाच्या शहरांकडे जाण्या- येण्यास प्रवासी या बस स्थानकात येतात. तालुक्यातील ग्रामीण भागातसुद्धा याच बस स्थानकातून बस जातात- येतात. यामुळे या बस स्थानकात कायम प्रवाशांची गर्दी असते.
या गर्दीचा फायदा उचलत, बस स्थानकातील पोलिस चौकीत पोलिस नसल्याने सोनसाखळी चोर, पाकीटमार, भुरटे चोरटे महिलांचे दागिने ओरबडणे, पुरुषांची पाकिटे मारण्याची संधी साधतात. यावर पोलिसांचा वचक नसल्याने त्यांचे चांगलेच फावते. वाढत्या चोर्या व पाकीटमारी रोखण्यास पोलिस प्रशासन अपयशी ठरते. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते.
संगमनेर बस स्थानकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उभारलेल्या पोलिस चौकीचे तत्कालीन पोलिस उपाधीक्षक संजय सातव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते, मात्र शहर पोलिस ठाण्यात पोलिस कमी असल्यामुळे पोलिस चौकीत पोलिस थांबत नव्हते. यामुळे साखळी चोरांसह पाकीटमारांचा सुळसुळाट वाढला होता.
'पोलिस कर्मचार्यांविना बस स्थानकातील पोलिस चौकीच बनली शोभेची बाहुली' अशा आशयाचे वृत्त दै. पुढारीने दि. 12 मे रोजी प्रकाशित केले होते. यानंतर दिवसेंदिवस या बस स्थानकात महिलांचे दागिने ओरबडण्याचे प्रमाण वाढत होते. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर या गंभीर बाबीची पो. नि. भगवान मथुरे यांनी त्याची दखल घेतली.
बस स्थानकात महिला पो. कॉ. सोमेश्वरी शिंदे, पोलिस अजित कुर्हे व महिला होमगार्ड सुनिता जंत्रे यांची कायमस्वरुपी नियुक्ती केली. याशिवाय दिवसभर दर तासाला साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली. यामुळे बस स्थानकात होणार्या वाढत्या चोर्यांना पायबंद घालण्यास मदत होणार असल्याने दै. पुढारीला धन्यवाद दिले जात आहेत.
संगमनेर शहरातील मेहेरमळा येथील बद्रीनारायण लोहे यांची 2 तोळ्याची सोनसाखळी, पिंपळगाव माथा येथील शांताबाई काशिनाथ सावंत यांचे सोन्याचे हातकडे व नथ असे 5 तोळ्यांचे दागिने, कल्याण येथील पंढरीनाथ लगड यांचे 5 तोळ्यांचे गंठण व दोन तोळ्यांची पोत असा 14 तोळ्यांचा मुद्देमाल, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रजनी राहणे यांच्या पिशवीतील साडेदहा तोळे सोन्याचे दागिन्यांचा डबा असे 15 लाख रुपयांचे 25 तोळे सोन्याची चोरी संगमनेर बसस्थानकातील नियमित प्रवाशांसाठी भीतीदायक ठरत असल्याने संतापाचे वातावरण आहे.
संगमनेर बसस्थानकामधील वाढत्या चोर्यांना पायबंद घालण्यासाठी कायम स्वरूपी दोन पोलिस कर्मचारी व होमगार्ड अशा तीन कर्मचार्यांची नेमणूक केली आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत जागा न सोडण्याचे आदेश दिले. याशिवाय साध्या वेशातील पोलिसांची नियमित गस्त सुरू केली आहे.
– भगवान मथुरे, संगमनेर शहर पोलिस निरीक्षक