अहमदनगर

नगर : धक्कादायक ! रेशनच्या धान्यात आढळला प्लास्टिकचा तांदूळ

अमृता चौगुले

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील पिंपरकणे येथे पुरवठा विभागाने रेशनकार्ड धारकांना दिलेल्या तांदळामध्ये प्लास्टिक केमिकल युक्त तांदूळ आढळून आला आहे. अन्नात भेसळ करून जीवाशी खेळणार्‍या भेसळ धारकांवर कारवाई करण्याची मागणी पिंपरकणे ग्रामस्थांनी तहसीलदार सतिश थेटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अकोले तालुक्यात 41 हजार 800 रेशनकार्ड धारक आहेत. शासनाने गोरगरीब, आदिवासी, दिन दुबळे, वंचित घटक अन्न धान्यापासून वंचित राहू नये, म्हणून गाव पातळीवर स्वस्त धान्य दुकानांची निर्मिती केली आहे.

या रेशनच्या माध्यमातून अनेक कुटुंब आपली पोटाची खळगी भरतात, मात्र आता रेशनमधून मिळणारे धान्य हे भेसळयुक्त आढळल्याने आदिवासी भागात मोठी खळबळ उडाली आहे.  आदिवासी दुर्गम भागातील पिंपरकणे गावात गेल्या दोन महिन्यांपासून आदिवासी बांधवांना प्लास्टिक सदृश तांदूळ मिळत असल्याचे वास्तव जि. प. माजी सदस्य बाजीराव दराडेसह पिंपरकणे ग्रामस्थांनी उघडकीस आणले. प्लास्टिक सदृश तांदूळ थेट नायब तहसीलदार ठकाजी महाले यांना दाखवत हा तांदूळ हा पाण्यावर तरंगत असून त्याला केमिकल सारखा उग्र वास येत असल्याने शासन आमच्या आदिवासी बांधवांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप पिंपरकणे पेसा अध्यक्ष धनंजय पिचड राजेंद्र लांडे विठ्ठल बांबळे, हेमंत पिचड, गणपत पिचड, किशोर पोटकुले, रंजना पिचड व ग्रामस्थांनी केला.

गेल्या 3 महिन्यांपासून 3 वेळेस देण्यात आलेल्या तांदूळामध्ये अडीच ते तीन किलो सर्रास संमिश्र तांदूळ आढळून आले आहेत.
या तांदळाला कोणतीही चव नाही. शिवाय दाताने हा तांदूळ तुटत देखील नाही. या तांदळापासून बनविलेला भात खाताही येत नाही. यामध्ये प्लास्टिक सदृश कण्या निघतात.  आपल्या विभागाला यापूर्वी अनेकवेळा विनंती केली. परंतु आपण त्याची दखल घेतली नाही. रेशनिंग धान्य व तांदूळ याची गुणवत्ता तत्काळ तपासून दोषींवर कार्यवाही करण्याचे निवेदन नायब तहसीलदार यांना यावेळी देण्यात आले.

SCROLL FOR NEXT