अहमदनगर

फोन पे रिक्वेस्ट; 89 हजारांचा गंडा, नगरमधील फेब्रिकेशन व्यावसायिकाची फसवणूक

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : खंडाळा येथे फार्म हाऊसवर गेट बनवायचे असल्याचे सांगून अ‍ॅडव्हान्सचे पैसे ऑनलाईन पाठवतो असे म्हणत नालेगावातील फेब्रिकेशन व्यावसायिकाची फोन-पे वर रिक्वेस्ट पाठवून 89 हजारांनी फसवणूक झाली आहे. याबाबत दीपक प्रभाकर गायके (रा.टांगेगल्ली, नालेगाव, हल्ली रा. बालिकाश्रम रोड, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नालेगाव येथे दीपक गायके यांचे फेब्रिकेशनचे दुकान आहे. त्यांना गुरूवारी (दि.15) एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने मी यादव बोलत असल्याचे सांगून खंडाळा येथे फार्म हाऊसवर गेट बनवायचे असून डिझाईन पाठविण्याचे सांगितले.

त्यानंतर गायके यांनी त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविलेल्या गेटच्या डिझाईन पैकी एक फोटो पाठवून गेट फायनल केले. त्यावर गायके यांनी 70 हजार रूपयांचे कोटेशन लागेल असे त्याला फोनवरून कळविले. सोमवारी (दि.19) गायके यांना आरोपीने फोन करून सांगितले की, मी तुम्हाला गूगल-पे वर 40 हजार पाठवतो. त्यानंतर सांगितले की गूगल-पे वरून ट्रान्झेक्शन होत नाही तुम्ही फोन-पे ओपन करा. फोन-पे सुरू केल्यानंतर गायके यांना 18 हजार 999 रूपयांची रिक्वेस्ट आली व त्यांना यूपीआय पिन टाकण्यास सांगितले. अशाप्रकारे तीन वेळा यूपीआय पिन टाकण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळात फोन-पे वरून 6हजार 599, 18 हजार 999, 69 हजार 999 असे एकूण 95 हजार 597 रूपये कट झाल्याचा मेसेज गायके यांना आला.  पैसे देण्याचा बहाणा करून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT