पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यावर धारदार शस्त्राने वार करून लुटणार्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. साहील कडूभाई शेख असे त्याचे नाव असून, तो अकोला ग्रामपंचायतीचा शिपाई आहे. न्यायालयाने त्याची 23 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. अन्य आरोपींची नावेही पोलिसांना समजली असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. फिर्यादी शिवाजी हाके यांनी शेख याला ओळखले आहे. त्याच्यासोबत असणार्या आणखी तिघांची नावेही पोलिसांना समजली आहेत. या आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले.
शिवाजी बापू हाके (रा.हाकेवाडी) हे 16 जानेवारी रोजी कापूस विकून मोटारसायकलवरुन घरी परतत होते. रस्त्यावर चारचाकी वाहन आडवे घालून चौघांनी त्यांना अडवून त्यांच्या जवळील एक लाख रुपये व पाच ग्रॅमचा सोन्याचा ताईत चोरून नेला. त्यांच्या पाठीवर चाकूने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण व सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी तपासाची सूत्रे जलदगतीने फिरविली. अकोला ग्रामपंचायतीचा शिपाई साहील शेख याला अटक केली. संशयित अकोला, धायतडकवाडी परिसरातीलच असल्याचे पोलिसांच्या तपासात समजले.