नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पीक विमा भरलेल्या शेतकर्यांनी प्रशासन व पीकविमा कंपन्यांशी संपर्क साधून आपला आर्थिक लाभ मिळवून घ्यावा यासाठी प्रशासनाने त्यांच्यात समन्वय साधावा, असे आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी केले. आमदार गडाख म्हणाले, तालुक्यात 1.10 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. या संपूर्ण क्षेत्रावर प्रामुख्याने ऊस, कपाशी, सोयाबीन ही पिके घेतली जातात. उर्वरित पिकेही कमी अधिक क्षेत्रावर घेतली जातात. त्यामुळे सध्या तरी तालुक्यात सोयाबीन व कपाशी पिकांचे क्षेत्र जादा असून, अतिवृष्टीमुळे पिके धोक्यात येऊन शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकर्यांनी सोयाबीन व कापूस पिकांचा पिक विमा भरला होता. त्यात ज्या शेतकर्यांनी सोयाबीनचा विमा भरला होता. त्यातील शेतकर्यांना कमी अधिक प्रमाणात आर्थिक लाभही मिळाला आहे. मात्र, तालुक्यात 7 हजार 252 शेतकर्यांनी जवळपास 21 हजार हेक्टर वर कपाशीची लागवड केली. त्यापैकी फक्त पाच हजार हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरविला आहे.
संपूर्ण कपाशीचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी ऐन दिवाळीत मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व शेतकर्यांना विमा कंपनींनी संपर्क करणे गरजेचे आहे. मात्र, त्यातील 3117 शेतकर्यांनीच फक्त पिकांचे नुकसान झाल्याचे विमा कंपनीशी संपर्क करून कळविले आहे. त्यामुळे ऑनलाईन कळविणे किंवा समक्ष फोन लावून कळविणे या तांत्रिक अडचणीमुळे शेतकर्याला पीक विमा कंपनीला कळविणे अडचणीचे ठरत आहेे. उर्वरित 4135 शेतकर्यांनी विमा कंपनीला नुकसान झाल्याचे कळविले नाही, म्हणूनच हे सर्व शेतकरी लाभापासून, विम्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेऊन शेतककर्यांचा विमा कंपनीशी संपर्क करून द्यावा, असे आवाहन गडाख यांनी केले.
तालुका कृषी अधिकार्यांशी संपर्क साधा
शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नयेत, म्हणून आमदार गडाख यांनीही तातडीने तालुका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. या सर्व शेतकर्यांचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज भरून घ्यावेत. हे अर्ज तत्काळ विमा कंपनीला पाठवावेत. ज्या शेतकर्यांनी अद्याप विमा कंपनीला झालेल्या पीक नुकसानीची माहिती ऑनलाईन कळविली नाही. त्यांनी ऑनलाईनच्या मागे न लागता दोन दिवसांत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करून माहिती भरून द्यावी, असे आवाहनही आमदार शंकरराव गडाख यांनी केले आहे.