अहमदनगर

पवार – काळे कुटुंबाचे कायमचे ऋणानुबंध ! : सुप्रिया सुळे

अमृता चौगुले

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षण संस्था, कारखाना व परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात काळे परिवाराचे योगदान जनता नेहमीच लक्षात ठेवील, असे सांगत पवार व काळे कुटुंबाचे कायमचे ऋणानुबंध आहेत. स्व. कर्मवीर शंकरराव काळे यांनी ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत दिलेले योगदान नेहमीच आदर्श राहील, अशा शब्दात आपल्या भावना संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केल्या. कोसाका उद्योग समुहाचे संस्थापक, शिक्षण महर्षी माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या 10 व्या पुण्यस्मरणार्थ त्यांना पुष्पांजली अर्पण करून, खा. सुप्रियाताई सुळे यांनी अभिवादन केले. यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, समाज शिकला तरच विकास होऊ शकतो, हे ओळखून ती ध्येय, धोरणे त्यांनी प्राधान्याने राबविली. शेतकरी व शिक्षणासाठी ठोस कार्यक्रम हाती घेऊन काळे यांनी सातत्य ठेवले. शिक्षण संस्था, कारखाना व परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात काळे परिवाराचे हे योगदान जनता नेहमीच लक्षात ठेवील. तोच वारसा माजी आ. अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आ. आशुतोष काळे यांच्या रूपाने पुढे चालविला जात आहे, याचा सार्थ अभिमान असल्याचे खा. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे यांना अभिवादन करण्यासाठी कारखाना, उद्योग समूह व सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, पदाधिकारी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती. माजी आ. अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे, अगस्ती कारखाना उपाध्यक्ष अशोकराव भांगरे, श्रीसाईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त महेंद्र शेळके, अ‍ॅड. प्रमोद जगताप, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायण मांजरे, कर्मवीर काळे कारखाना व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक, प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, सतीश कृष्णानी, बाळासाहेब कदम, जि. परिषद, पं. समिती सदस्य, राष्ट्रवादी पदाधिकारी, रयत शिक्षण संस्था शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व कर्मवीर काळे साखर कारखाना व उद्योग समुहावर प्रेम करणारे हितचिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या उभारणीत स्व. यशवंतराव चव्हाण यांना ज्या कुटुंबांनी साथ दिली, त्यामुळे महाराष्ट्र पुढे गेला. यामध्ये काळे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. सहकार चळवळ जिवंत ठेवणे, टिकविणे व विकासात सर्वांना एकत्र घेऊन महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आणला. यामध्ये काळे कुटुंबाचे सातत्याने योगदान होते.

                                                                – संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT