अहमदनगर

नगर : पाथर्डीचा आगामी आमदार ठाकरे शिवसेनेचा : आमदार सुनील शिंदे

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात गुरवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दहा शाखेचे उद्घाटन झाले असून, तालुका शिवसेनामय झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर झालेला अन्याय जनतेला सहन झालेला नाही. म्हणून त्यांच्याबद्दल शहरासह ग्रामीण भागतील जनतेत प्रचंड सहानुभूती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पाथर्डीचा आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच नक्की असेल, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी केले.  तालुक्यातील कारेगाव, मोहटे, चिंचपूर इजदे, करोडी, तिनखडी, भिलवडे, पिंपळगाव टप्प्पा, चिचपूर पांगुळ, वडगाव, जोगेवाडी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले.

जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, पाथर्डी तालुकाप्रमुख भगवानराव दराडे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी काटे, रावजी नांगरे, पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या विधानसभा संघटक पुष्पा गर्जे, अशोक गायकवाड, राजेंद्र म्हस्के, उपतालुका प्रमुख अमोल जायभाये, भाऊसाहेब धस, महादेव रहाटे, शायद पठाण, दत्ता दराडे, शिवाजी कंठाळे, मीरा बडे, सविता पवार, संजय गोल्हार, अंकुश आव्हाड, नवनाथ उगलमुगले, आदर्श काकडे आदींसह शाखाप्रमुख उपस्थित होते. ठिकठिकाणी आमदार शिंदे व पदाधिकार्‍यांचे ढोल ताशाच्या वाद्यात फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आमदार शिंदे म्हणाले, मातोश्री आमच्यासाठी मंदिर असून, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्यासाठी दैवत आहेत. शिवसेनेची ग्रामीण भागातील जनतेशी नाळ घट्ट जोडली गेली आहे. पुढील काळ फक्त शिवसेनेचा आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा वरचष्मा राहिल. शिवसेनेबाबत कोर्टाचा निर्णय काहीही होऊ द्या, त्यांचे दिवस मात्र थोडेच राहिले आहेत. राज्य सरकार काम कमी अन् घोषणा व प्रसिद्धीच जास्त करत आहे. शेतकरी प्रोत्साहन अनुदान योजनेत नगर जिल्ह्यातील एक लाख 31 हजार शेतकरी लाभापासून वंचित आहेत. त्यासाठी आक्रमक होऊन आंदोलन करा, मोर्चा काढा, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी खांद्याला खांदा लावून लढू, आमदार शिंदे म्हणाले. यावेळी राजेंद्र दळवी, राजेंद्र म्हस्के यांची भाषणे झाली. तालुकाप्रमुख भगवानराव दराडे यांनी प्रास्ताविक केले. सुखदेव मर्दाने यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब धस यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT