अहमदनगर

पाथर्डी बाजार समिती निवडणूक ; जातीय समीकरणेच ठरणार निर्णायक !

अमृता चौगुले

अमोल कांकरिया : 

पाथर्डी तालुका : पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार मोनिका राजळे व अ‍ॅड. प्रताप ढाकणे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो, जातीपातींची गणिते जुळविण्यात यशस्वी ठरणार्‍या गटाची सरशी होत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे या निवडणुकीत ढाकणे व राजळे गट कशा पद्धतीने उमेदवार उभे करतात, यावरच कोण बाजी मारणार हे ठरणार आहे. बाजार समितीच्या मागील निवडणुकीत स्व.मोहनराव पालवे, स्व.अनिल कराळे यांच्या सहकार्यामुळे ढाकणे गटाचे पारडे जड होते. यावेळी त्यांची कमी या गटाला जाणवणार आहे. तर, काही विद्यमान संचालक बाजूला गेल्याने, यंदाच्या निवडणुकीत अ‍ॅड.ढाकणे यांचा चांगलाच कस लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून सर्व सत्तास्थाने राजळे गटाकडे असताना, गेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवार निवडीत ढाकणे गटाने सहकारात प्राबल्य असणार्‍या मराठा उमेदवारांना झुकते माप दिले.

त्यामुळे अनपेक्षितरित्या राजळे गटाची सत्ता उलथून ढाकणे गटाने बाजार समिती ताब्यात घेतली होती. त्या निवडणुकीत राजकीय चाणक्ष अशी ओळख असणारे राजीव राजळे आजारी असल्याने उमेदवार निवडीत त्यांचा फारसा सहभाग नव्हता, असे जाणकार सांगतात. मागील निवडणुकीत झालेली चूक सुधारून राजळे गट मराठा उमेदवारांना झुकते माप देणार की भाजपाचा पारंपरिक मतदार असणार्‍या वंजारी समाजालाच संधी देणार, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे.

बाजार समितीसाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांची मनधरणी करून जास्त संचालक कसे निवडून येतील, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी इच्छुकांपैकी निवडून येऊ शकणार्‍यालाच जातीय बेरजेचे राजकारण करून उमेदवारी द्यावी लागणार आहे.

मागील पंचवार्षिकच्या निवडणुकीची स्व.राजीव राजळे हे होते. आता ते नसल्याने निवडणुकीचा संपूर्ण भार आमदार मोनिका राजळे यांच्या खांद्यावर आहे. मागील निवडणुकीत उमेदवार देण्यामध्ये राजळे गटाचा फॉर्म्युला चुकीचा ठरल्याने विरोधकांनी ही सत्ता काबीज केली होती. या निवडणुकीत आमदार राजळे आपल्या पॅनलकडून उमेदवारी देतात कोणते निकष लावतात, यावर त्यांच्या गटाच्या विजयाचे भवितव्य ठरणार आहे.

मागील निवडणुकीत अ‍ॅड.ढाकणे उमेदवारी देताना मराठा समाजाला प्राधान्य दिले होते. आता तशीच काहीशी व्यूहरचना आमदार राजळे करणार का? याकडे लक्ष लागून आहे. तसे झाल्यास एकास एक तोडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसतील. परिणामी ही निवडणूक अटीतटीची अन् प्रतिष्ठेची होईल. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून आम्हीच निवडणूक जिंकणार, असा दावा केला जात आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता निवडणूक तेवढी सोपी राहिलेली नाही. मतदारांची मानसिकता, त्यांचा कल पाहिला तर तो कोणत्या पॅनलकडे झुकेल, हे उमेदवार फायनल झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

चंद्रशेखर घुलेंच्या भूमिकेकडे लक्ष
जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाल्यानंतर, त्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतलेली आहे. आगामी निवडणुकीत सक्रिय होण्याचे संकेतही त्यांनी दिलेले आहेत. त्याचा फटका आमदार राजळे यांना या निवडणुकीत बसणार का, हे मात्र निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

माघारीनंतर उमेदवार निश्चित होणार
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 155 इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले असून, 20 एप्रिल हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उमेदवार निश्चित होणार आहेत. मात्र, राजळे व ढाकणे हे दोन्ही नेते निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. गावोगावी जाऊन मतदार, कार्यकर्ते, ग्रामस्थांच्या बैठका, भेटीगाठी सुरू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT