सिद्धटेक (ता. कर्जत ); पुढारी वृत्तसेवा : विविध मागण्यांसाठी भांबोरा येथील शिक्षकांनी शाळा बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन शिक्षकांचा निषेध नोंदविला. याबाबत पालकांची बैठक झाली. यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. बैठकीस ग्रामपंचायत, सेवा सोसायटीचे चेअरमन, संचालक, चेअरमन, पालक उपस्थित होत.
आमचा पेन्शनला विरोध नाही. परंतु या मागणीसाठी बेमुदत शाळा बंद ठेवण्यास विरोध आहे . यासाठी शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन तातडीने शाळा सुरू कराव्यात. ऐन परीक्षेच्या तोंडावर संप झाल्याने पालकांमध्ये संतापाची भावना आहे. आंदोलनाचे इतरही मार्ग आहेत. शाळा बंद हा यावर उपाय नाही, असे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष औदुंबर जगताप यांनी सांगितले.
कोरोनात शाळा दोन वर्षे बंद असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता कुठे सुरळीतपणा आला होता. मुलंही आनंदी शिक्षण घेत होते. संपामुळे मुलांचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. त्यामुळे शिक्षकांनी शाळेत हजर व्हावे, असे शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शरद लोंढे यांनी सांगितले.