वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : वेल्हे व पानशेत परिसर जवळच्या अंतराने जोडणार्या पानशेत – कादवे मार्गे वेल्हे रस्त्याची चाळण झाली आहे. कादवे ते विहीरपर्यंतच्या घाटरस्त्यावर खड्डे पडले असून, रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. त्यामुळे खोल दरीत वाहने कोसळून मोठ्या दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. रस्त्याच्या डांबरीकरणावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु, डांबर पावसात वाहून गेले. कुरण खुर्द गावापासून कादवे ते विहीर गावापर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे . खिंडीत डोंगराच्या दरडी उन्मळलेल्या आहेत. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. खड्डे बुजवून घाटरस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत पडवळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.
तोरणा- वेल्हे भागाला पानशेत परिसर जवळच्या अंतराने जोडण्यासाठी 1962 मध्ये कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. त्यानंतर वेळोवेळी या रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. असे असले तरी अद्यापही या घाटरस्त्याने एसटी सेवा सुरू झालेली नाही. दूध, बांबू, शेतीमालाच्या वाहतुकीसह खासगी प्रवासी वाहतूक सुरू आहे. वेल्हे, पानशेत, सिंहगड भागात ये – जा करण्यासाठी जवळचे अंतर असल्याने या रस्त्यावर अलिकडच्या काळात वाहतूक वाढली आहे. शनिवार – रविवार व इतर सुटीच्या दिवशी पर्यटकांची वर्दळ असते. अरुंद ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, तसेच संरक्षण कठडे उभारण्यात यावेत, अशी मागणी कादवे येथील शंकर ढेबे, वैभव जागडे आदी ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा :