आमचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन देणार : उद्धव ठाकरे File Photo
अहमदनगर

आमचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन देणार : उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

पुढारी वृत्तसेवा

नगर : पुढारी वृत्तसेवा

ज्यांनी विश्वासघात केला, आईसारख्या शिवसेनेवर वार केले, त्यांच्यावर जनता कसा विश्वास ठेवणार, असा सवाल करत आता हे विश्वासघातकी सरकार घालवून आपले सरकार आणण्याची गरज आहे. या बदलाची ताकद तुमच्यात आहे, आपले सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी लागू करू, असा शब्द माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौर्‍यावर आले आहेत. आज शिर्डी येथे साईदर्शन घेतल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी कोपरगावातील महाअधिवेशनाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी महायुतीचा समाचार घेताना पेन्शनप्रश्नी मोठे विधान केले.

ठाकरे म्हणाले, आपल्याला सत्तेची चिंता नाही, आपल्याला जनतेच्या आयुष्याची चिंता आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबियांची चिता आहे. सत्ता येते आणि जाते, गेलेली सत्ता परत येणार आहे. आपण ती खेचून आणणार. आता हे सरकार गेल्यात जमा आहे. त्यांना पेन्शन कसले त्यांना आता टेन्शन देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पेन्शनच्या मागणीसाठी उपोषण करू नये. जनता आधीच उपाशी आहे. आता उपोषण नको, सत्ताधारी सत्तेशिवाय उपाशी राहायला हवे, असे आपले आंदोलन हवे, अशा आंदोलनाचा निर्धार करा. आंदोलनाची मशाल पेटल्यावर सरकारच्या चमच्यांना त्यावर पाणी ओतायला देऊ नका, जुनी पेन्शन योजना आपल्या सर्वांनी एकत्र येत, आपले सरकार आणत अंमलात आणायची आहे. तुमचा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे आता आपण सर्व येत आपले सरकार आणा, तुमची मागणी आपण मान्य करतो, हा माझा शब्द आहे, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले.

मी तुम्हाला जुन्या पेन्शन योजनेचा शब्द दिल्यानंतर आता ते कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेतील. आतापर्यंत ज्यांना बहीण होती, हे आपल्याला माहिती नव्हते, त्यांनी अचानक लाडकी बहीण योजना आणली. तसेच आता ते कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेतील, असा दगाफटका फक्त तुमच्याशी नाही, महाराष्ट्राशी होण्याची शक्यता आहे. आपणही शेतकरी कर्जमुक्ती केली, पण त्याचा असा गाजावाजा केला नाही. आपण आपले काम केले. आता फक्त गाजावाजा होत आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

तुम्ही 10 टक्के कापले जातात, ते त्यांच्या लाडक्या मित्रांच्या खिशात जात आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सांगितले की, जुनी पेन्शन योजना ते लागू करणार नाहीत. त्यामुळे राज्यातील सरकारचे चेलेपेले काहीही करू शकत नाहीत. दिल्लीने डोळे मोठे केले की यांचे काही चालत नाही. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवत ते विविध योजना आणत आहे. योजना चांगल्या असल्या तरी तिजोरीचा विचार करायला हवा. मात्र, सरकार जनतेच्या पैशांवर योजना जाहीर करत आहेत. त्यामुळे आता त्यांना पेन्शन देऊन टाकू, त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. तुम्ही सरकार चालवू शकतात तसेच सरकार बदलूही शकतात. आता हे सरकार बदलून आपले सरकार आणण्याची वेळ झाली आहे, असेही आवाहन ठाकरे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT