अहमदनगर

शेतकर्‍यांसाठी धान्य, फळे महोत्सव भरवा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या फळे, भाजीपाला, धान्य, प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विक्रीसाठी धान्य व फळे महोत्सवाच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकार्‍यांना दिल्या. जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक पालकमंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक विलास नलगे, उपसंचालक राजाराम गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले, कृषी उपसंचालक किरण मोरे यांच्यासह जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणांचे सर्व अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत लाभार्थी शेतकर्‍यांना 51 ट्रॅक्टर व 2 कम्बाईन हार्वेस्टरचे वितरण पालकमंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले. खरीप हंगाम 2022 मध्ये पीक स्पर्धेत जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न घेणार्‍या मंगल शिंदे, दीपक ढगे, सुभाष कर्डिले, बाबूराव धनगर, शांताराम बारामते, विक्रम अकोलकर या शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला. खरीप हंगाम 2023-24 मध्ये मटकी पिकाचे 900 एकरवर प्रात्यक्षिकासाठी 45 क्विंटल बियाणे वाटप करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून, यातील 5 प्रातिनिधिक शेतकर्‍यांना मटकी बियाण्याचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप हंगामात शेतकर्‍यांना कर्जवाटपाची नियोजनाप्रमाणे कार्यवाही करावी. सन 2023 हे वर्ष आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष असल्याने पौष्टीक तृणधान्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी व पौष्टीक तृणधान्यावर प्रक्रिया प्रकल्प वाढविण्यासाठी जनजागृती करावी. कृषी विभाग व कृषी विद्यापीठाने खरीप हंगामात शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे. तालुकानिहाय पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले.

जलयुक्तसाठी 257 गावांची निवड

जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यात 257 गावांची निवड करण्यात आलेली आहे. हे अभियान यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी उत्कृष्ट कामकाज करावे, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. शासनाने मागेल त्याला फळबाग, ठिबक, तुषार सिंचन, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह व आधुनिक पेरणी यंत्र, कॉटन थ्रेडर या योजनांचा समावेेश केला आहे. महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करून या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री विखे यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT