अहमदनगर

नगर : पावसाने शेतकर्‍यांवर ‘अवकळा’

अमृता चौगुले

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची दाणादाण उडवली. कांदा, गहू, चारा पिकांबरोबर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वारा, विजांचा कडकडाट अन् गारपीटीमुळे अनेक भागात झाडे, विजेचे पोल उन्मळून पडले, तर विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाल्याने संपूर्ण तालुक्यातील वीज गायब झाली. नगर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा सर्वात जास्त फटका जेऊर, देहरे गटाला बसला आहे. जेऊर पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसाने काढणीला आलेला कांदा, गहू, चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढणीला आलेल्या कांद्याच्या गाभ्यात पाणी गेल्याने कांदा सडणार असून, तो वखारीत टिकणार नाही. चारा पिके कडवळ, मका भुईसपाट झाले.

जेऊर पट्टा कांदा उत्पादनात अग्रेसर असून, येथील बहुतेक गावरान कांदा काढणीला आलेला होता. त्यामुळे येथील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बहिरवाडी, इमामपूर, ससेवाडी, उदरमल, सोकेवाडी, पांगरमल, धनगरवाडी परिसरात ही कांदा व इतर पिकांचे नुकसान झाले. वाळकी, खडकी, हिंगणगाव परिसरात जोरदार वार्‍यामुळे मोठमोठाली झाडे उन्मळून पडली. विजेचे पोल पडल्याने परिसरातील वीज गायब झाली. वाळकी, खडकी परिसरातील संत्राच्या बागांची फळ गळती होऊन नुकसान झाले.

तालुक्यात बहुतांशी भागातील गव्हाची काढणी झालेली आहे. तुरळक प्रमाणात गव्हाचे नुकसान झाले. परंतु कांदा, चारा पिके, संत्रा, आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगामातील मूग, सोयाबीन, बाजरी पिकांच्या अतिवृष्टीने नुकसान झाले. त्यामुळे खरीप पिकांचे उत्पन्न पदरी पडले नाही. त्यानंतर लाल कांदा कवडीमोल भावाने विकावा लागला. त्यात खर्चही वसूल झाला नाही. रब्बी हंगामातील पिकांवर शेतकर्‍यांच्या मोठ्या अशा होत्या; परंतु गारपिटीने झालेल्या नुकसानीने शेतीचे संपूर्ण वर्ष तोट्यातच गेले आहे. तरी, गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

देहरे गावात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने नऊ एकर क्षेत्रावरील गावरान कांद्याचे नुकसान झाले. कांद्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च करण्यात आला. परंतु, आता खर्च देखील वसूल होणार नाही.
                                                              – संजय लांडगे, शेतकरी, देहरे

खरीप हंगामातील पिके वाया गेली. लाल कांदा कवडीमोल भावाने विकला गेला. रब्बी हंगामावर अवकाळीचे संकट आले. संपूर्ण वर्षातील शेती तोट्यात गेली. शेतकरी कर्जबाजारी झाला असून, आर्थिक गणित कोलमडले आहे.
                                                       – बाळासाहेब तवले, शेतकरी, जेऊर

शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत मिळणे गरजेचे आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा, संत्रा, आंबा, चारा पिकांचे नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, त्यांना मदत मिळणे गरजेचे आहे.
                                                – आबासाहेब सोनवणे, सरपंच, हिंगणगाव

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT