नगर : पुढारी वृत्तसेवा : उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने आलमगीर परिसरातून एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.1) घडली होती. भिंगार कॅम्प पोलिसांनी आरोपींचा शोध घेत एका तासात एका आरोपीला अटक केली आहे. अपहरण झालेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली. अथर हुसैन बोहरी (रा. फुलारी टॉवर जवळ, आलमगीर ता. जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजुम बाबासाहेब सय्यद, फैजान जहागिरदार, अश्पाक बाबासाहेब सय्यद, इरशाद बाबासाहेब सय्यद (चारही रा. मोमीन गल्ली, भिंगार ता. जि. अहमदनगर) व एक अनोळखी इसम अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार येथील वडारवाडी येथे एका खोलीत अपहरण करून एकाला डांबून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने वडारवाडी येथे जाऊन अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली. ही कारवाई हेडकॉन्स्टेबल विलास गारूडकर, पोलिस नाईक भानुदास खेडकर, राहुल द्वारके, अमोल आव्हाड, अरूण मोरे या पथकाने केली. पुढील तपास पांडुरंग बारगजे करीत आहेत.