नगर; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील उद्भवलेला लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. राज्य सरकारच्या सूचनांनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सन 2022-23 मध्ये जिल्हा नियोजन समितीकडील निधीमधून एक कोटींचा निधी जिल्हा परिषदेला तातडीने उपलब्ध करून दिला आहे.
राज्यात गोवंशीय पशुधनामध्ये उद्भलेला विषाणूजन्य व सांसर्गिक लंपी चर्मरोगावर तत्काळ नियंत्रण आणण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करणे, बाधित जनावरांवर केंद्र शासनाच्या सूचनांनुसार औषधोपचार करणे, सिरीजेस, निडल्स, पीपीई किटस्, बाधित क्षेत्रातील गुरांच्या गोठ्यात व परिसरात औषध फवारणी करणे, त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व उपकरणे, सेवादाता, पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतर्वासिता छात्र यांच्या मार्फत लसीकरणासाठी मानधन, मृत पशुधनाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, इत्यादी खर्च भागविण्यासाठी सन 2022-23 मध्ये जिल्हा नियोजन समितीकडील अर्थसंकल्पित केलेल्या निधीमधून 1 कोटींचा निधी झेडपीला देण्यात आला आहे.
सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर हे या निधीतून उपाययोजनांचा आराखडा तयार करणार असल्याचे सूत्रांकडून समजले.
728 जनावरे बाधित; 30 मृत्यू
जिल्ह्यात लंपी बाधित जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे. काल सोमवार अखेर 728 जनावरे बाधित झालेली आहेत. यातील 30 गायींचा मृत्यू झाला, तर 343 जनावरे बरी झाली आहेत. बाधित जनावरांच्या पाच किमी अंतरातील 767 गावे लसीकरणास पात्र आहेत. या गावांतील 8 लाख 26 हजार 131 जनावरांना लसीकरण करण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे. त्यासाठी 7 लाखांपेक्षा अधिक लस शिल्लक आहे आतापर्यंत 4 लाख 13 हजार 589 जनावरांना लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे.