अहमदनगर

गुंजाळवाडीत भाजपविरुद्ध एकास-एक उमेदवार : आ. थोरातांची रणनीती

अमृता चौगुले

संगमनेर : तालुक्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणार्‍या गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस गटाकडून, आम्हाला सरपंचपदाची उमेदवारी मिळाली पाहिजे, या मागणीसाठी काँग्रेसचे विधि मंडळ पक्ष नेते, आ. बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व मानणारे दोन्ही गट आग्रही आहेत, मात्र गेल्या निवडणुकीत मोठ्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या. यामुळे कुठल्याही परिस्थितीत गुंजाळवाडी ग्रामपंचायत हातातून निसटता कामा नये, यासाठी जनतेतील सरपंचपदासाठी भाजपाच्या विरोधामध्ये एकास- एक उमेदवार देण्याच्या तयारीत काँग्रेस असल्याची चर्चा होत आहे.

त्यामुळे दोन्ही गटांपैकी आ. थोरात नेमकं कोणत्या गटाला उमेदवारी देतात, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
संगमनेर तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजली जाणारी शहरालगत सर्वाधिक विस्तार असलेली अशी गुंजाळवाडी ग्रामपंचायत जिल्ह्यात ओळखली जाते. आत्तापर्यंत ग्रामपंचायतीवर सत्ताधारी काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांचे एक हाती वर्चस्व राहिले, मात्र गेल्यावेळी निवडणुकीमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने निमोण, तळेगाव, जोर्वे, निळवंडे, कोल्हेवाडी आणि आता त्या पाठोपाठ वडगाव पान अशा मोठ्या ग्रामपंचायतीचे जनतेतून निवडून आलेले सरपंच भाजपकडे खेचण्यात मंत्री विखे यांना यश मिळाले आहे. यामुळे आ. थोरात यांचे एक हाती वर्चस्व असलेल्या गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद कसे भाजपकडे येईल, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

माजी महसूल मंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व मानणारे पं. स. माजी उपसभापती नवनाथ अरगडे यांच्या गटाकडून अमोल संभाजी गुंजाळ यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे तर त्यांचे नेतृत्व मानणारे रोहिदास रेवजी गुंजाळ यांनीही स्वतःला जनेतेतून सरपंचपदाची उमेदवारी मिळाली पाहिजे, असा हट्ट आ. थोरात यांच्याकडे धरला. यामुळे आ. थोरात यांना या दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणावे लागणार आहे.

भाजपकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा सरपंच कसा निवडून येईल, यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरु झाले आहे. काँग्रेसच्या उमेदवाराच्या तोडीस- तोड उमेदवार देण्यासाठी भाजपकडूनसुद्धा हालचाली सुरू आहेत. भाजपकडून भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रविंद्र संभाजीराव थोरात व भाजपचे ज्येष्ठनेते नामदेव धोंडीबा गुंजाळ, युवा नेते महेश जगताप या तिघांपैकी एकच जनतेतून सरपंचपदाची उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यामुळे खर्‍या अर्थाने गुंजाळवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीस काँग्रेस विरोधात- भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT