कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खडांगळे यांनी बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान, आज (27 मार्च ते 3 एप्रिल) पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. 5 एप्रिल रोजी छाननी होईल. कोरोना आपत्ती व औरंगाबाद खंडपीठ न्यायप्रविष्ठ बाबीमुळे बाजार समितीची निवडणूक तीनदा पुढे ढकलली होती.
काळे- कोल्हे-परजणे- औताडे सहमती एक्सप्रेस असल्याने निवडणूक बिनविरोध होणार, असे सध्याचे चित्र आहे. शेतकर्याच्या संस्थेत राजकारण आणायचे नाही, हा प्रघात स्व. शंकरराव काळे व माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी घालुन दिल्याने त्यांची पुढची पिढीही हाच कित्ता गिरवत आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघावर काळे – कोल्हे यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या दोन्ही साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या.
कोपरगाव बाजार समितीत निवडणूक अर्ज भरलेल्यांना 20 एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. 21 एप्रिल रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. त्याचदिवशी चित्र स्पष्ट होईल. कोपरगाव तालुक्यासह पंचक्रोशीतील सर्व शेतकरी कृषी माल बाजार समितीत विक्रीसाठी आणतात. कृषीमालासह डाळींब फळाचे स्वतंत्र मार्केट येथे उभारले आहे. गेल्या 5-7 वर्षांमध्ये प्रत्येक गटाच्या सभापती- उपसभापतींनी शेतकर्यांना पायाभूत सुविधा निर्माण करून देण्यासाठी ज्या त्या परिने काम केले आहे. अंतर्गत थोड्याफार कुरबुरी असतात, मात्र त्याचे पर्यावसन थेट वादात कधीच घडलेले नाही.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात काकडी विमानतळ, नगर-मनमाड महामार्ग, पुर्वीचा नागपूर- मुंबई द्रुतगती महामार्ग, नव्याने झालेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, एन. एच. 160 नाशिक-शिर्डी मार्ग आदी रस्त्यांचे जाळे मजबुत तयार झाले आहे. संगमनेर- शिर्डी- नाशिक रेल्वेमार्ग होऊ घातला आहे.
त्यामुळे येथील शेतकर्यांना कृषी माल देश-विदेशात पोहोचवण्याची संधी निर्माण झाली आहे. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या प्रक्रियेत बाजार समित्यांना देखील खासगी बाजार समितीचे आव्हान निर्माण झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा तयार झाल्याने त्याचा फायदा शेतकरी घटकांना होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. ही निवडणूक सहमतीत होणार, असे चित्र दिसते.
कुणाची वर्णी लागते, याची उत्सुकता..!
प्रत्येकजण आपापल्या कार्यकर्त्यांना बाजार समितीवर संधी देणार असल्याने येथे कुणाची वर्णी लागते, हा चर्चेचा विषय ठरणार आहे.