अहमदनगर

नगर : निळवंडेचे पाणी हे स्व. कोल्हे यांचे फलित : प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे

अमृता चौगुले

कोपरगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर शेतीचा पाण्याच्या प्रश्नावर संघर्ष केला, निळवंडे डावा कालवा पाणी चाचणी हे त्यांच्याच कार्य कर्तृत्वाचे फलित असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. शंकरराव कोल्हे आणि शेती पाण्याचा संघर्ष राज्याला परिचित आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पोहेगाव परिसराच्या 11 जिरायती गावातील शेतकर्‍यांच्या तीन पिढयांनी निळवंडे कालव्याच्या पाणीप्रश्नी संघर्ष करत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनराव कोल्हे यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेसह रस्तारोको आंदोलनास साथ दिली.

या लढ्याला यश येऊन केंद्र तसेच राज्य शासनाने कालवे होण्यासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देत जिरायती भागातील शेतकर्‍यांच्या शेती विकासाचे स्वप्न खर्‍या अर्थाने पूर्ण करण्यासाठी निळवंडे धरण डावा कालव्याची पाणी चाचणी घेतली. या पाण्याचे जलपुजन रांजणगाव देशमुख परिसरातील भागवतवाडी येथे करण्यात आले. त्याप्रसंगी स्नेहलता कोल्हे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष साईनाथराव रोहमारे होते.

स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, पाटपाणी संघर्ष, रस्तारोको या सार्‍यांची अनुभूती सासरे स्व शंकरराव कोल्हे यांच्याकडून शिकायला मिळाली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांची हृदयाची शस्त्रक्रिया ठरली असतानाही त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून निळवंडे प्रश्नी 23 मे 2012 रोजी निर्मळपिंपरी येथे रस्तारोकोत सहभाग दिला, या प्रसंगाची आज आठवण आली तरी शरीरावर काटा उभा राहतो. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती नानासाहेब गव्हाणे, धनंजय वर्पे यांनी मनोगते व्यक्त केली. कैलास राहणे यांनी प्रास्तविक केले.

स्व. कोल्हेंमुळेच निळवंडे धरण
शेती आणि कार्यकर्त्यांची नाळ तुटू नये आणि लाख मोलाची मिळवलेली माणसं कायम बरोबर असावी याची सातत्याने स्व. शंकरराव कोल्हे यांना जाणीव होती म्हणूनच हे निळवंडे धरण झाले असल्याचे माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT