अहमदनगर

गुजरातमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांचे सूचक विधान

अमृता चौगुले

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : राज्यात अनेक उद्योग,व्यावसायिकांना येण्याची इच्छा आहे, तरीदेखील ते प्रकल्प बाहेर जात आहेत. अवकाळी पावसामुळे सामान्य होरपळून निघाला आहे. मात्र राज्य सरकार त्यांना दिलासा देण्यामध्ये अपयशी ठरल्याचा घाणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत केला. गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष काँग्रेससोबत जाण्याच्या विचारात असल्याचे ते म्हणाले. शिर्डीतील राष्ट्रवादी मंथन शिबिराच्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, खा. सुप्रिया सुळे, राजेश टोपे, एकनाथ खडसे यावेळी उपस्थित होते.

पटेल म्हणाले, कार्यकर्त्यांसाठी शिबीर ,मेळावे घेतले जातात. त्यांना दिशा देण्याचे काम या माध्यमातून केले जात असते. गुजरातमध्ये होत असलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस बरोबर जाण्याच्या विचारात आहे. एकटे निवडणूक लढविल्यास त्याचा फायदा विरोधकांना होत असतो. भाजपला शह द्यायचा असेल तर सोबत निवडणुका लढल्या गेल्या पाहिजे. कार्यकर्त्यांनी भूलथापांना बळी पडू नका, या अजित पवार यांच्या वक्तव्याकडे पटेल यांचे लक्ष वेधता, ते म्हणाले, त्याचा काही अर्थ नसून केवळ सूचक वक्तव्य म्हणून त्याकडे पहावं. अजित पवार यांचे स्वबळावर लढण्याचे जे वक्तव्य आहे, ते केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आहे. इतर निवडणुकांसाठी नाही. त्यामुळे त्याचा विपर्यास करू नये. नागपूरमधील ङ्गमिहानफचा विकास न होण्याला देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी जबाबदार असल्याचा आरोप पटेल यांनी केला.

राहुल गांधी यांची पदयात्रा सुरू असून त्यासंदर्भात काँग्रेसचे नेते शरद पवार यांना भेटले आहेत. जेव्हा ही यात्रा राज्यात येईल, तेव्हा त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याबाबत पवारांनी अनुकूलता दर्शवली आहे. मात्र शिवसेनेच्या भूमिकेबाबत बोलण्यास पटेल यांनी टाळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT