कर्जत, पुढारी वृत्तसेवा: कर्जत शहरात अनेक राष्ट्रीयीकृत बँकांची विनापरवाना ग्राहक सेवा केंद्र मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या केंद्रामधून नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक अडवणूक करण्यात येत असून, या अनधिकृत केंद्रांना बँकेचे अधिकारी देखील पाठीशी घालत असल्यामुळे यामागचे नेमके गूढ येथे निर्माण झाले आहे.
कर्जत शहरात भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया यासह इतर बँकांचे अनेक ग्राहक सेवा केंद्र सुरू आहेत. या सर्व ग्राहक सेवा केंद्रांना या राष्ट्रीयीकृत बँकांचे वित्तीय समावेशक या विभागाच्या वतीने अधिकृत मान्यता देण्यात येते. अशा पद्धतीने कर्जत शहरांमध्ये मान्यता दिलेले ग्राहक सेवा केंद्र यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक सेवा केंद्र सुरू आहेत. मान्यता नसताना ही ग्राहक सेवा केंद्र कशी चालविली जातात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांनी ग्रामीण भागातील वृद्ध महिला, विद्यार्थी यांच्यासाठी त्यांच्या गावांमध्ये त्यांना सर्व बँकेची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ग्राहक सेवा केंद्र सुरू केले आहेत. या सेवा केंद्राच्या माध्यमातून बँकांमध्ये पैसे भरणे, काढणे, खाते उघडणे यासह अनेक व्यवहार केले जातात. ग्रामीण भागात केंद्र सुरू केल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा हे दोन्ही वाचतील, हा या पाठीमागील मुख्य हेतू आहे. असे सर्वच बँकांनी तालुक्यातील ग्रामीण आणि खेडे गावामध्ये ग्राहक केंद्र मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सोयीसाठी मंजूर केले आहेत.
मात्र, कर्जत शहरात सुरू असलेले हे केंद्र ग्रामीण भागामध्ये मंजूर झालेले असून, प्रत्यक्षात या गावातील नागरिकांना सुविधा न देता जास्तीत जास्त व्यवसाय करण्यासाठी कर्जत शहरात जाणीवपूर्वक चालविले जात असल्याचेे दिसून येते. मात्र, यामुळे ग्राहक सेवा केंद्राच्या निर्मितीच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना कर्जत शहरात येऊन बँकेचे व्यवहार करावे लागत आहेत. यासाठी त्यांचा वेळ पैसा आणि श्रमही खर्च होत आहेत.
या ग्राहक सेवा केंद्र चालकांना राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये नागरिकांचे खाते उघडताना विनाशुल्क म्हणजे मोफत खाते उघडण्याची नियम आहे. असे असतानाही प्रत्यक्षात नागरिकांकडून शंभर रुपये खाते उघडण्यासाठी घेतात. याशिवाय पैसे काढणे आणि भरणे यासाठीदेखील बँकेच्या ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याचे दिसून येते.
बँक अधिकार्यांची डोळेझाक
हा सर्व प्रकार कर्जत शहरातील सर्व बँकांच्या अधिकार्यांना माहीत आहे. असे असतानाही ते या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. हे करताना रिझर्व्ह बँकेच्या ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन या सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांकडून होत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून, याबाबत योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.