अहमदनगर

नगर :  शिक्षक बँक निवडणुकीची चाहूल !

अमृता चौगुले

नगर :  पुढारी वृत्तसेवा : शिक्षक बँक निवडणुकीसंदर्भात आज सोमवार दि. 12 रोजी औरंगाबाद खंडपीठात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यातच न्यायालयाने जिल्ह्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत बँकेच्या निवडणुकीवरील स्थगितीही उठणार का? याकडे चारही मंडळाच्या उमेदवारांसह तब्बल 10 हजार शिक्षक सभासदांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या जिव्हाळ्याची संस्था असलेल्या शिक्षक बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होती.

सत्ताधारी गुरुमाऊलीचे नेते बापूसाहेब तांबे, गुरुकुलचे डॉ. संजय कळमकर, रोहोकले प्रणित गुरुमाऊलीचे रावसाहेब रोहोकले, आणि चौथ्या आघाडीचे राजेंद्र शिंदे यांनी प्रचाराला वेग दिला होता. तालुकानिहाय बैठका सुरू होत्या. फोडाफोडीच्या राजकारणाने निवडणूक रंगात आली होती. त्यात नाराजांची मनधरणी करताना संघटनेच्या नेत्यांच्याही दमछाक सुरू होती. 24 जुलै रोजी मतदान, तर 25 ला मतमोजणी होणार होती. मात्र, तत्पूर्वीच राज्यातील सरकार बदलले आणि अतिवृष्टीचे कारण देऊन 15 जुलै रोजी सहकारातील सर्व निवडणुका 'आहे त्या स्थितीत' 30 सप्टेंबरपर्यंत थांबविण्याचा निर्णय झाला. यात जिल्ह्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याबरोबरच शिक्षक बँकेची निवडणूकही लांबणीवर पडली.

दरम्यान, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या समर्थकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. डॉ. संजय कळमकर यांनीही मुंबईत तळ ठोकून पाठपुरावा केला. रोहोकले गुरुजींनीही निवडणुका वेळेत घेण्याबाबत आपले 'वजन' वापरले होते. तत्पूर्वी अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीसाठीही एक याचिका दाखल होती. त्यावर सुनावणी घेताना न्यायालयाने कारखाना निवडणूक घेण्याचे आदेश केले आहेत. या सुनावणीचा आधार घेतला, तर आजच्या सुनावणीत शिक्षक बँकेच्या निवडणुकीचाही मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.

सरकारचे म्हणणे आज येणार
न्यायालयाने तांबेे गटाच्या याचिकेवर वेळोवेळी सुनावणी घेतली. यातील 30 ऑगस्टच्या सुनावणीत अ‍ॅड. शिवाजी शेळके यांनी बँकेच्या निवडणूक घेण्याबाबत अभ्यासपूर्ण युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने सरकारला फटकारताना 12 सप्टेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश केले होते. त्यामुळे या सुनावणीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

SCROLL FOR NEXT