अहमदनगर

 नगर तालुक्यात रब्बीच्या आशा पल्लवीत

अमृता चौगुले

नगर तालुका : नगर तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. उत्तरा नक्षत्रात बरसलेल्या पावसामुळे खरीप पिकांना तसेच फळबागांना नवसंजीवनी मिळाली असून आगामी येणार्‍या नक्षत्रात होणार्‍या पावसावर रब्बी पिकांचे भवितव्य अवलंबून आहे. तालुक्यातील 11 मंडळांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सुमारे साडेतीन महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. आर्द्रा नक्षत्रात बरसलेल्या थोड्याफार प्रमाणातील पावसावर शेतकर्‍यांनी सोयाबीन, बाजरीची पेरणी केली होती. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. वेळेवर खरीप पिकांना पाऊस झाला नसल्याने उत्पन्नात घट होणार आहे. परंतु सध्याच्या पावसामुळे काही प्रमाणात का होईना बाजरी, सोयाबीन, चारा पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

पावसाळ्यातच पाण्याचा, चार्‍याचा प्रश्न भेडसावत होता. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना रब्बी हंगामावर देखील दुष्काळाचे सावट घोंगावत होते. तालुक्यात सर्वदूर झालेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. जेऊर, चिचोंडी पाटील, रुईछत्तीसी पट्ट्यातील काही बंधारे भरले असून नद्या, ओढ्या, नाल्याने चालु पावसाळ्यात प्रथमच पाणी वाहिले गेले आहे. रुईछत्तीसी परिसरातील शुढळा नदीवरील सर्व बंधारे तुडुंब भरून नदी वाहती झाली आहे. चिचोंडी पाटील परिसरातील मेहेकरी नदी तसेच जेऊर येथील सीना नदीला चांगल्या प्रमाणात पाणी वाहिले गेले.

फळबागा, चाराही जगला
वाळकी, खडकी, रुईछत्तीसी पट्ट्यातील फळबागा धोक्यात आल्या होत्या. फळबागधारक शेतकर्‍यांना पावसाने मोठा दिलासा दिला आहे. बाजरी, सोयाबीन पिके टवटवीत झाली असून गर्भगिरीच्या डोंगररांगा देखील हिरव्यागार होत आहेत. वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होत असलेली वणवण थांबणार आहे. शेतकर्‍यांसमोर चारा, पाण्याच्या प्रश्नामुळे पशुधन जगवावे कसे असा प्रश्न पडला होता. आता चार्‍याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

नक्षत्रांकडे लागल्या नजरा
रब्बी हंगामातील पिकांसाठी आणखी पावसाची आवश्यकता असून आगामी हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रात पाऊस होईल अशी आशा शेतकरी करत आहेत.

कांदा लागवडीची लगबग
बैलपोळ्यापासून लाल कांद्याची लागवड करण्यात येत असते परंतु पावसाअभावी कांद्याची रोपे टाकण्यात आली नाही. त्यामुळे लाल कांद्याच्या क्षेत्रात घट होणार आहे. विजयादशमीपासून रांगडा कांद्याची लागवड करण्यात येते तर दीपावली पासून गहू, गावरान कांद्याची लागवड करण्यात येत असते. परंतु अद्याप तालुक्यातील अनेक भागात भूजल पातळीत वाढ झाली नसून आगामी नक्षत्रात होणार्‍या पावसावर रब्बी हंगामाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

13 गावांना टँकरने पाणी
ऐन पावसाळ्यात तालुक्यातील तेरा गावांनी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे तर दोन गावांची विहीर, कुपनलिका अधिग्रहण करून तहान भागविली जात होती.

मागील वर्षी अतिवृष्टी व अवकाळीने शेती तोट्यातच गेली. सध्या पाऊस झाला असला तरी रब्बीसाठी आणखी पाऊस गरजेचा आहे.
                                     -महादेव गायवळ ( शेतकरी, चिचोंडी पाटील)

इमामपूर गावामध्ये ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. परिसरात चांगला पाऊस झाला असला तरी भुजल पातळीत वाढ झालेली नाही.
                                       -भीमराज मोकाटे ( माजी सरपंच, इमामपूर)

शनिवारी  मंडल निहाय पाऊस (मि. मी.)
नालेगाव – 166
सावेडी – 117
कापुरवाडी – 117
केडगाव – 128
भिंगार- 96
नागापुर – 68
जेऊर – 102
चिचोंडी पाटील – 89
वाळकी-96
चास -162
रूईछत्तीशी – 119

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT