अहमदनगर

नगर : जिल्ह्यातील 215 ग्रामपंचायतींत घोटाळे !

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीमध्ये अफरातफर झाल्याच्या तक्रारी येतात. लेखापरीक्षणात यामध्ये अपहारही सिद्ध होतात. मात्र, त्यानंतर तत्कालीन दोषी ग्रामसेवक, सरपंच आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांकडून वसुली करताना ग्रामपंचायत विभागाची दमछाक होताना दिसते. आजही 215 ग्रामपंचायतींच्या घोटाळ्यातील तब्बल 3 कोटी 16 लाखांच्या वसुलीसाठी झेडपीतून तगादा सुरू आहे. जिल्ह्यात 1318 ग्रामपंचायती आहेत. दरवर्षी या ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहाराचे लेखापरीक्षण केले जाते. यात संशयास्पद व्यवहार किंवा अपहार झाल्याची शंका निर्माण झाल्यास त्यावर कारवाई केली जाते. ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 140 अन्वये वार्षिक हिशोब तपासणीत आढळलेल्या अपहाराबाबत रितसर सुनावणी घेतली जाते. यात संबंधित ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, त्यांच्य पदाधिकार्‍यांना बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतरच दोषींवर जबाबदारी निश्चित करून अपहाराची रक्कम वसूल केली जाते.

1965 पासून आजपर्यंत घोटाळ्याची सहाशेपेक्षा अधिक प्रकरणे पुढे आली आहेत. या प्रकरणात मोठी वसूली येणे होती. आजपर्यंतच्या पाठपुराव्यातून सात कोटींची वसूली पूर्तता केलेली आहे. तर अजुनही 215 प्रकरणे वसुलीस पात्र आहेत.  संबंधित ग्रामपंचायतीमधील तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व पदाधिकार्‍यांकडून अशाप्रकारे 3 कोटी 16 लाख 36 हजार 833 रुपयांची वसुली केली जाणार आहे. वसुलीसाठी ग्रामपंचायत विभागाकडून पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान, ही वसूलीची रक्कम ज्या खात्यात अपहार झालेल्या आहे, त्याच ग्रामनिधीच्या खात्यात भरली जात आहे. आतापर्यंत साधारणतः 7 कोटींची वसूली पूर्तता करण्यात यश आले आहे. मात्र, वसूलीपात्र लोकांमधील काही सेवानिवृत्त झाले, काहींचा मृत्यू झाल्याचेही समजते. त्यामुळे आता ही वसुली कशी करणार, असा प्रश्न मात्र प्रशासनापुढे कायम आहे.

जिल्ह्यातील 215 अपहार प्रकरणे पेंडींग आहेत. संबंधित ग्रामपंचायत अपहारातील रक्कम वसूलीसाठी प्रशासन सातत्याने पाठपुरावा करत आहे. सीईओंच्या मार्गदर्शनात लवकरच आपण निर्धारीत केलेले वसूलीचे उद्दीष्ट गाठणार आहोत. – सुरेश शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रा.पं

तालुका ग्रामपंचायत अपहार
अकोले 7 7,54,613
संगमनेर 3 27,41,516
कोपरगाव 7 4,91,222
राहाता 3 22,65,465
श्रीरामपूर 8 26,94,707
राहुरी 14 5,15,579
नेवासा 21 33,31,912
शेवगाव 14 20,99,378
पाथर्डी 14 12,29,027
नगर 29 14,68,175
पारनेर 32 99,43,811
श्रीगोंदा 3 1,60,663
कर्जत 38 26,52,777
जामखेड 22 12,87,985
एकूण 215 3,16,36,833

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT