अहमदनगर

धार्मिक स्थळांबाबत विशेष खबरदारी घ्या; शेवगाव दंगलीमुळे पोलिस ‘अलर्ट’

अमृता चौगुले

नगर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शेवगावच्या दंगलीमुळे जिल्ह्याचे नाव राज्यात झळकले. यापुढे अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी शहरासह जिल्ह्यातील वादग्रस्त धार्मिक स्थळांबाबत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी पोलिस अधिकार्‍यांना दिल्या. शेवगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर डॉ.शेखर यांनी पोलिस अधिकार्‍यांना 'अलर्ट' राहण्याच्या सूचना केल्या आहेत. शेवगावात दोन गटांत झालेल्या वादाचे पडसाड संपूर्ण राज्यात पाहायला मिळाले.

दंगलीत सहभागी असणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींची पोलिस प्रशानाकडून धरपकड सुरूच आहे. डॉ. शेखर यांनी शेवगावमधील दंगलग्रस्त भागाची पाहणी करून पोलिस अधिकार्‍यांना सूचना केल्या. त्यानंतर शनिवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात क्राईम मिटिंगमध्ये पोलिस अधिकार्‍यांना विशेष सूचना त्यांनी केल्या.

प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत वादग्रस्त असलेल्या धार्मिक स्थळांची माहिती यावेळी पोलिस अधिकार्‍यांनी दिली. तसेच, कोठेही वाद होण्याची शक्यता वाटल्यास त्या दृष्टीने उपाययोजना कशा पद्धतीने करता येतील, याबाबत काही सूचना यावेळी शेखर यांनी केल्या. धार्मिक स्थळांबाबत वाद असलेल्या गुन्ह्यांकडे विशेष लक्ष देण्यावर पोलिस अधिकार्‍यांना सांगण्यात आले. क्राईम मिटिंगमध्ये त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेतला. गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण, गुन्ह्यांचा तपास याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी बैठकीत दिली. यावेळी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

मिरवणुकांबाबत विशेष काळजी घ्या

राजकीय तसेच धार्मिक मिरवणुकांबाबत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना डॉ.बी.जी.शेखर यांनी पोलिस अधिकार्‍यांना केल्या. सर्व बाबींची पडताळणी करून मिरवणुका तसेच सभांना परवानगी द्या. अनधिकृत मिरवणुका यापुढे होता कामा नयेत, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

गोपनीय विभाग दक्ष ठेवा

पोलिस दलात गोपनीय विभाग असतो. पोलिस ठाण्यातील संबंधित कर्मचारी धरणे, आंदोलने, मोठ्या सभा, मिरवणुका आदींची माहिती संकलित करतात. यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गोपनीय विभागाला 'दक्ष' राहण्याच्या तसेच 'डेटा' गोळा करण्याच्या सूचना डॉ.शेखर यांनी केल्या.

SCROLL FOR NEXT