नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : इमामपूर (ता. नगर) येथील हनुमंत दामोधर आवारे अपहरण व खूनप्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. आवारेच्या मृतदेहाचे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर शनिवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश आवारे (रा. इमामपूर), शुभम भाऊसाहेब आहेर (रा. वडगाव गुप्ता), बाळू छबुराव भगत (रा. शेंडी), महेश कैलास पठारे, दीपक साळवे (रा. शिंगवे नाईक), महेश कुसमाडे अशी अटक आरोपींची नावे आहेत. गोपाल कराळे (रा. शेंडी) अद्याप पसार आहे.
आवारे याचे बुधवारी (दि. 13) घराजवळून शुभम आहेर, बाळू भगत यांनी अपहरण केल्याबाबत भाऊ कृष्णा आवारे याने फिर्याद दिली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी शुभम आहेर, बाळू भगत यांना अटक केली. आरोपींकडे कसून चौकशी केल्यानंतर खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. मयत आवारे बुधवारी गोठ्यावर झोपायला जात असताना त्याला रस्त्याच्या भांडणाच्या कारणावरून वरील आरोपींनी शेंडी गावच्या शिवारातील भैरोबा खोरीतील रावसाहेब विठ्ठल कराळे यांच्या मक्याच्या शेतामध्ये नेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, तिथे असलेल्या तारेचा करंट देऊन त्यास ठार मारून मारले, असे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी पुरवणी जबाब घेऊन खुनाचे वाढीव कलम लावले.
या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली तर, आरोपी पसार आहे. आज दुपारी इमामपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या शुभम आहेर, बाळू भगत यांच्याकडून पोलिसांना गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा गिअर बॉस फुटल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांना दुचाकी अडवाटेने गेल्याची शंका आली. त्याबाबत विचारणा केली असता आरोपींनी आम्ही कच्च्या रस्त्याने जाऊन शेंडी शिवारात हनुमंतला सोडून दिल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी परिसर पिंजून काढला असता हनुमंतचा मृतदेह आढळून आला.
हेही वाचा