अहमदनगर

नगर : महाविद्यालयातच मिळणार जात प्रमाणपत्र!

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : इयत्ता अकरावीत शिकणार्‍या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सेतू सुविधा केंद्रामार्फत महाविद्यालयातच जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी जात प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांना डाटा तयार करण्याचे काम समाजकल्याण विभागाचे समतादूत करीत आहेत. महसूल विभागाच्या सकरात्मक प्रतिसादामुळे मंडणगड पॅटर्नला नगर जिल्ह्यात बळ मिळाले आहे. मंडणगड पॅटर्नचा परिचय करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यासाठी बुधवारी ऑनलाईन वेबीनार घेण्यात आला. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी विकास पानसरे यांनी वेबीनारमध्ये अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातून सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख आणि सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत खरे सहभागी झाले होते.

राज्याचे समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी महाविद्यालयातच जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्याच्या सूचना केल्या.
'मंडणगड पॅटर्न'नुसार महाविद्यालयात जात प्रमाणपत्र देण्याच्या संकल्पनेला महसूल विभागाच्या अधिकार्‍यांचा उत्स्फूर्त असा सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. आठ दिवसात जात प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांचा डाटा प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच जात प्रमाणपत्र वितरित करण्यास सुरूवात करण्यात येईल,अशी माहिती संशोधन अधिकारी भागवत खरे यांनी दिली आहे. या मंडणगड पॅटर्नमुळे पालक, विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.

आठ दिवसांत जमा करणार डाटा

इयत्ता अकरावीत प्रवेशित किती विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नाही. याचा डाटा समतादूत यांच्यामार्फत आठ दिवसांत जमा करण्यात येईल. महसूल विभागाचे सेतू सुविधा केंद्र महाविद्यालयात पाठविण्यात येईल. या केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार असल्याचे समिती अध्यक्ष विकास पानसरे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT