श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील थत्ते मैदान पाळण्यांसाठी 34 लाख रुपयांच्या पुढेच देण्यावर ठाम असलेल्या पालिकेच्या अडेलतट्टू धोरणामुळे अखेर यंदा खासगी जागेत पाळणे व खेळण्या गेल्याने पालिकेने आता ठेकेदारांसह पाळणा चालकांवर नियमांचा बडगा उगारला आहे. यंदा हे मैदान मोकळे राहु नये, यासाठी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी श्रीराम नवमी यात्रा कमेटीला थत्ते मैदानाबाबत रविवारी सुट्टीच्या दिवशी पाचारण करुनही समाधानकारक चर्चेविणाच कमेटी परतली. याबाबत आज अंतिम निर्णय न झाल्यास पालिकेची बदनामी अटळ आहे.
श्रीरामपुरचा श्रीराम नवमी यात्रोत्सव अवघ्या 3 दिवसांवर येवून ठेपला असताना अजुनही खेळण्या, पाळण्यांच्या जागांचा तिढा सुटला नाही. मागील वर्षीचा लिलाव न परवडल्याचे कारण पुढे करुन ठेकेदारांनी लिलावाच्या पहिल्या दिवसापासुनच नाराजी दाखवल्याने व पालिका प्रशासन गेल्या वर्षीच्याच 34 लाखांपुढील बोलीवर ठाम असल्याने देणारे- घेणार्यांमध्ये मेळ बसलाच नाही. परिणामी पाळणे आणायचेच, या ईर्षेने ठेकेदारांनी पाळण्यांच्या मोटारी बेलापूर रोडलगत रासकर यांच्या खासगी जागेत उतरविल्याने पालिका नोटिसा काढुन कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
लिलावाच्या पहिल्या दिवशीच आकड्यांचा मेळ न बसल्याने पालिकेने त्याच दिवशी दुपारी 2 वाजता श्रीराम नवमी यात्रा कमेटीस पत्र देत लिलाव घेण्यास आमंत्रित केले होते. पत्रात 34 लाखांच्यापुढे बोलीसह 18 टक्के जीएसटी आकारण्याचे म्हटल्याने कमेटीने नाराजी व्यक्त केली, मात्र पुन्हा रविवारी कमेटी सदस्यांशी मुख्याधिकार्यांनी चर्चा करुनही योग्य तोडगा न निघाल्याने आजच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. याबाबत कामगार नेते नागेश सावंत म्हणाले, पालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे पाळण्यांच्या जागेचा घोळ झाला आहे. पालिका व्यावसायिक संस्था नसल्याचे ते म्हणाले.