अहमदनगर

मुंडे बंधू-भगिनीचे मनोमिलन? भारजवाडी येथे श्री संत भगवानबाबा नारळी सप्ताहात आले एकाच मंचावर

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  श्री संत भगवानबाबांच्या नारळी सप्ताह सांगता कार्यक्रमात मंगळवारी पंकजा आणि धनंजय मुंडे या बहीण-भावाच्या मनोमीलनाचे संकेत मिळाले. 'मी भगवानगडाची पायरी' असे पंकजा यांनी या वेळी सांगितले, त्यांची री ओढत 'मी त्या पायरीचा दगड' असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले, तेव्हा बीड जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे पुढील काळात वेगळे वळण घेण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली. राजकीय वैर कठोरपणे जोपासणार्‍या या भावंडांनी एकमेकांवर उधळलेल्या स्तुतिसुमनांची राज्याच्या राजकारणातही चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे महंत नामदेवशास्त्री यांनीही या भावंडांना न भांडता प्रेमाने राहण्याचा सल्ला दिला आणि 'पंकजा माझी मुलगी' असा पुनरुच्चारही केला. तसेच गडाचे महंतपद तीन वर्षांनंतर सोडण्याचेही त्यांनी जाहीर केले. तालुक्यातील भारजवाडी येथे श्री संत भगवानबाबांच्या 89 व्या नारळी सप्ताहाची सांगता मंगळवारी झाली. या सोहळ्यात भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे अनेक वर्षांनंतर एका व्यासपीठावर आले. त्यातच धनंजय मुंडेही तेथे आले. तिघांच्या भाषणांतील टीका-टिप्पण्यांनी कार्यक्रमाला राजकीय रंग चढला.

या वेळी आमदार मोनिका राजळे, बाळासाहेब आजबे, अ‍ॅड. प्रताप ढाकणे, भीमराव धोंडे, अरुण मुंडे, माणिक खेडकर, बाळासाहेब बटुळे, माणिक बटुळे, संजय कीर्तने, माणिक खेडकर, डॉ. मनोरमा खेडकर, अजय रक्ताटे आदी उपस्थित होते.
विखे यांची धावती भेट भगवानबाबांनी सुरू केलेल्या 89 व्या नारळी सप्ताहाच्या सांगता समारंभाला सुरवातीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या सप्ताहाचे आयोजन करण्याची संधी मला द्यावी, अशी विनंती त्यांनी नामदेवशास्त्री यांना केली. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ते निघून गेले.

ढाकणेंची 21 लाखांची देणगी
दरम्यान, अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी गडावरील बांधकामाला 21 लाख रुपयांची देणगी या वेळी जाहीर केली.

मोठ्याने बोलते, तो अहंकार नाही : पंकजा मुंडे
डॉ. नामदेवशास्त्री यांच्या भाषणातील धागे घेऊनच पंकजा मुंडे यांनी त्यांचे भाषण गुंफले. त्या म्हणाल्या, "कीर्तनाच्या मंचावर संतांनी राजकारण करू नये, मी मोठ्याने बोलले तर तो अहंकार समजू नका. मी आजही स्वतःला गडाची पायरी मानते. बाहेर पडल्याशिवाय ताकद कळत नाही. गोपीनाथगडाचे लोकार्पण करताना 'याच गडावरून राजकारण कर' हा शास्त्रींनी दिला. मी हिरकणीसारखी भगवानगडावरून खाली आले. तुम्ही शिव्या दिल्या, तरी मी त्या फुलासारख्या मानीन. तुम्ही जोड्याने मारले तर मी त्या पादुका समजेन. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला चुकीचे सांगितलेले दिसते." धनंजय व माझ्यात काहींनी लावालावी केली; आमच्यात लढाया लावणार्‍यांना काय साध्य करायचे आहे, ते माहीत नाही. गडावर धनंजयला दगड मारले तेव्हा शास्त्री गडावर होते. मी नव्हते… आता गडाला माझ्या वतीने धनू मदत करील. तो मोठा झाला तर मला आनंद आहे, असेही पंकजा म्हणाल्या.

सुईच्या टोकाएवढेही मतभेद नाहीत : धनंजय मुंडे
धनंजय मुंडे म्हणाले, "पंकजा व माझ्यात विचारांच्या वाटण्या आहेत. आम्ही राजकीय बाबतीत वेगवेगळे असलो, तरी आमच्यात काहीही नाही. निवडणुकीपुरते वैर ठीक आहे. मात्र भगवानगडाच्या बाबतीत आम्ही एकच आहोत. ताई दोन वेळा आमदार झाल्या. मंत्री झाल्या. मी आमदार झालो, विरोधी पक्षनेता व मंत्रीही झालो. राजकारणात हे चालू असते. इथे आम्ही नेते नाहीत. केवळ भक्त म्हणून गडावर असू. घरातील माणसांमध्ये संवाद असावा, असे वाटत होते, ते आज घडले आहे. माझ्यात व पंकजात सुईच्या टोकाएवढेही मतभेद नाहीत. गडाच्या बाबतीत बहीण-भाऊ म्हणून आम्ही जबाबदारी पार पाडू. माझी नियतीवर श्रद्धा आहे. जे घडले ते चांगले घडले. आम्ही राजकीयदृष्ट्या वेगळे झाल्याने दोघेही आमदार झालो व मंत्री झालो. एकत्र असतो तर असे घडले असते का़?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT