अहमदनगर

‘त्यांना’ डीएसपी ब्लॅकशिवाय काहीच कळत नाही : खासदार सुजय विखे

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : विरोधकांना डीएसपी ब्लॅक शिवाय काहीच कळत नाही. त्यांची वैचारिक मानसिकता भ्रष्ट असून, ते समाजासाठी काहीच करू शकत नाहीत. हे गुंड तुमच्या कामाचे नसून, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी माझ्यासारखा सुशिक्षित गुंड लागतो, असे रोखठोक वक्तव्य करीत खासदार डॉ.सुजय विखे यांनी नाव न घेता आमदार लंके यांच्यावर जोरदार टीका केली. पाथर्डी नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना सुमारे 85 लाख रुपयांची अनुदान हप्ता रक्कम वितरित करण्यात आली. यावेळी खासदार विखे बोलत होते. यावेळी आमदार मोनिका राजळे, माणिक खेडकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, बजरंग घोडके, राहुल राजळे, अशोक चोरमले, नारायण धस, अजय भंडारी, विष्णुपंत अकोलकर, अजय रक्ताटे, महेश बोरूडे, रामनाथ बंग, बबन बुचकुल, मंगल कोकाटे, नामदेव लबडे, बंडू बोरूडे, मुकुंद लोहिया, प्रवीण राजगुरू, अ‍ॅड. प्रतिक खेडकर, मुख्याधिकारी संतोष लांडगे उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, जे माझ्या विरोधात बोलतात, ते कधी जनतेत फिरत नसून दोन घरात भेटी दिल्यावर त्यांना वाटते की, वातावरण चांगले आहे. दोन लोकांच्या भेटीगाठीने या जिल्ह्याचा खासदार ठरत नाही. स्वप्न पाहून शेवटच्या तीन महिन्यांत कोणी निवडून येत नाही. त्यासाठी साडेचार वर्षे जमिनीवर राहून जगावे लागते. आमच्यावर अनेक विरोधक बोलतात, हे आम्हाला नवीन नाही. गेल्या पन्नास वर्षांपासून आमच्यावर कुरघोड्या करून आम्हाला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही लोकांशी विकासात्मक अशी नाळ जोडून ठेवली आहे. त्यामुळे कसलाही फरक पडला नाही.

आमदार राजळे म्हणाल्या, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांची थकीत अनुदानाची रक्कम ही नगरपालिकेने दाबून ठेवलेली नाही. नगरपालिकेचा सातत्याने यासाठी पाठपुरावा सुरू होता. केंद्र व राज्य शासनाच्या काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे येण्याला विलंब झाला. खासदार व मी तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे थकीत हप्त्याची रक्कम आज मिळत आहे. प्रास्तविक डॉ मृत्युंजय गर्जे यांनी केले. सूत्रसंचालन राजू सुरवसे यांनी केले. अंबादास साठे यांनी आभार मानले.

सत्ताधारी नगसेवकांत गटबाजी
माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या रखडलेल्या अनुदानावरून आंदोलन करणार्‍यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर त्याला उत्तरही देण्यात आले. यामुळे नगरपरिषदेत सत्ताधारी नगरसेवकांची गटबाजी जाहीररित्या दिसून आली.

तालुक्यात सध्या आंदोलनाचे फॅड
पाथर्डी तालुक्यात सध्या आंदोलनाचे फॅड सुरू आहे. एखादं काम सुरू व्हायचं असेल की, लगेच आंदोलन करायचं आणि त्याचं श्रेय घ्यायचं. आमच्यामुळं पत्र निघालं आणि काम सुरू झालं, असा सध्या ट्रेंड सुरू आहे. तेवढं तरी बरं आहे की हे फक्त कामांपुरतंच आहे, असा मिश्किल टोला खासदार विखे यांनी विरोधकांना लगावला.

माझ्याकडे सगळे फॉर्म्युले : विखे
आमदार राम शिंदे हे आमदार नीलेश लंकेंच्या गाडीत एकत्र असतात, या विषयावर बोलताना खासदार विखे म्हणाले, मी काय फोडाफोडी करेल, याचा तुम्हाला अंदाज नाही. आज दुसर्‍या गाडीत दिसणारे कधी या गाडीत येतील, हे तुम्हाला कळणारही नाही. माझ्याकडे सगळे फॉर्म्युले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT