Pudhari Photo
अहमदनगर

खासदार लंके रिक्षाने निघाले पवारांच्या भेटीला !

साधेपणाचे दिल्लीतही अप्रूप; वाहन नसल्याने घेतला निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी बुधवारी (दि. २५) सकाळी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनापर्यंतचा प्रवास चक्क रिक्षाने करून दिल्लीकरांना आश्चर्याचा धक्का दिला.

महाराष्ट्र सदनात खासदार लंके यांच्यासाठी एक खोली देण्यात आली आहे. तिथे शपथविधीसाठी दिल्लीत आलेल्या महिलांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे लंके हे हॉटेलमध्ये वास्तव्यास असून, बुधवारी सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीचा निरोप मिळाल्यानंतर वाहन उपलब्ध नसल्याने लंके यांनी रिक्षाने महाराष्ट्र भवनापर्यंतचा प्रवास केला.

महाराष्ट्र सदनापर्यंत रिक्षाने

गळयात संसद सदस्याचे ओळखपत्र असलेल्या व्यक्तीने संसद भवनापर्यंत सोडण्याची सूचना केल्यानंतर अॅटोचालकही अचंबित झाला. त्याने खासदार लंके यांना आदराने महाराष्ट्र भवनापर्यंत पोहोचविण्याची तयारी दर्शविली.

निलेश लंके हे महाराष्ट्र सदनापर्यंत रिक्षाने पोहोचल्याचे तिथे उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील नेते, तसेच कार्यकर्ते अचंबित झाले. दिल्ली येथे खासदार लंके यांच्यासाठी सध्या वाहनाची व्यवस्था नाही. खासदार सुप्रिया सुळे यांचे वाहन ते वापरतात. मात्र, ज्येष्ठ नेते पवार यांच्या भेटीचा निरोप आला. त्यावेळी लंके यांच्याजवळ एकही वाहन नव्हते. त्यांनी हॉटेलबाहेर येत थेट रिक्षाला हात करून महाराष्ट्र भवनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

साधेपणाचे दिल्लीतही अप्रूप

सन २०१९ मध्ये लंके आमदार झाले. मात्र, त्यानंतरही त्यांचा साधेपणा नेहमीच अनुभवण्यास मिळाला. अनेकदा त्यांनी दुचाकीवरून प्रवास केला. कधी मारूती ओमिनी, तर कधी मारूती कारमध्ये प्रवास करतानाही त्यांना अनेकांनी पाहिले. मुंबईत आमदार निवासमध्ये लंके यांनी नेहमीच जमिनीवर झोपणे पसंत केले. कोव्हिड सेंटरमध्येही हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत जमिनीवर झोपल्याची अनेक छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT