पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी रविवारी सुटीच्या दिवशीही राज्य कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी पाथर्डी शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. 'एकच मिशन जुनी पेन्शन..शेतकर्यांच्या मुलाला पेन्शन मिळाली पाहिजे.., सामान्यांच्या मुलाला पेन्शन मिळाली पाहिजे.., खासगीकरण बंद करा..,' अशा घोषणा देत पंचायत समिती कार्यालय समोरून मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ झाला.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आंदोलकांनी अभिवादन केले. रविवारचा आंदोलनाचा सहावा दिवस आहे. रवि देशमुख, रोहिदास आघाव, हरी सानप, संदीप बडे, उषा शिंदे, मनीषा कंठाळी, कविता महाजन, अनिता गोसावी, राजेंद्र कांडेकर, प्रमोद म्हस्के, महारुद्र बडे, दिलीप बोरूडे, कल्याण लवांडे, अर्जुन शिरसाट, अतुल आंधळे, कल्पजित डोईफोडे, संदीप भागवत, सीताराम सावंत, परिमल बाबर, धर्मा जोशी, दीपक बडे, नीलेश क्षीरसागर, भय्या गायकवाड, अजिंक्य कांकरिया आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचा आंदोलनास पाठिंबा
राज्य कर्मचार्यांनी जुन्या पेन्शनसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला तालुक्यातील चिंचपूर ईजदे ग्रामपंचायतीने पाठिंबा दिला असून, याबाबत मुख्यमंत्र एकनाथ शिंदेंना पत्र पाठवून सरपंच पुष्पा मिसाळ यांनी शासकीय व नीम शासकीय कर्मचान्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. यासाठी पाठिंबा दर्शविला आहे.