अहमदनगर

गुप्तधनासाठी बेलापुरात मायलेकीचा खून, न्यायालयाच्या आदेशानुसार शहर पोलिसात 12 जणांवर गुन्हा दाखल

अमृता चौगुले

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे राहणारी विवाहित महिला ज्योती शशीकांत शेलार व तिची लहान मुलगी नमोश्री शशीकांत शेलार (वय 9) या दोघी माय- लेकींचा गुप्त धनासाठी स्फोट घडवून आणत खून केल्याचे समोर आले असुन मयत ज्योती हिच्या पतीसह दोन मांत्रिक बाबा, अशा 12 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. स्फोटाची ही घटना 6 जानेवारी जानेवारी 2022 रोजी घडली होती. या घटनेने तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती. घटना घडल्यानंतर या घटनेत जखमी झालेल्या माय-लेकींना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

घटना घडल्यानंतर पोलिसांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला होता. सदरचा स्फोट खुप मोठा झाल्याने अनेकांनी घरात गॅस व्यतिरीक्त आणखी दुसरी ज्वलनशील वस्तू असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्या दृष्टीने एटीसच्या अधिकार्‍यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. गॅस कंपनीच्या अधिकार्‍यांनाही बोलविण्यात आले होते. या सर्वांनी घटनेची पाहणी केल्यानंतर गॅस गळतीमुळेच ही घटना झाल्याचा निकष काढला होता.

दरम्यान, भाजलेल्या मायलेकींवर उपचार सुरू असताना महिला ज्योती शेलार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पाठोपाठ काही दिवसांनी मुलीचाही मृत्यू झाला. या घटनेचा तपास करीत पोलिसांनी हा स्फोट गॅसच्या सिलेंडरचा होऊन यामध्ये माय-लेकींचा मृत्यू झाल्याचे दफ्तरी नोंद केली. परंतु सदरचा स्फोट घडवून मायलेकींना गुप्त धनासाठी मारण्यात आले असल्याची शंका मयत ज्योती शेलार यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली होती. त्यांनी याबाबत पोलिस अधिक्षकांना निवेदनही दिले होते. परंतु पोलिसांनी त्यांचे म्हणने न ऐकल्याने त्यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती.

या फिर्यादीची दखल घेत न्यायालयाने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले. त्यानुसार मयत महिलेचे भाऊ राजेंद्र कचरू नन्नवरे (रा. पिंपळाचा मळा, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मयतेचा नवरा शशीकांत अशोक शेलार, अशोक ठकाजी शेलार, लीलाबाई अशोक शेलार, बाळासाहेब अशोक शेलार, कविता बाळासाहेब शेलार, पवन बाळासाहेब शेलार (रा. बेलापूर ता. श्रीरामपूर), काजल किशोर खरात, किशोर, सुखदेव खरात, अनिकेत पाटोळे (रा. कोल्हार), गागरे बाबा, सांगळे बाबा, देवकर गुरु यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT