अहमदनगर

`‘मनरेगा’ कर्जत तालुका प्रथम क्रमांकावर

अमृता चौगुले

कर्जत/जामखेड : पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात जिल्ह्यात कर्जत तालुका प्रथम क्रमांकावर आहे. कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यात मिळून सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाची अशी 21 कोटी रुपयांची पाचस हजाराहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. 'रोहयो'च्या माध्यमातून जास्तीतजास्त कामे मार्गी लावण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी दोन्ही तालुक्यांत अनेक कार्यशाळा घेतल्या. यामध्ये अधिकारी, पदाधिकारी, रोजगार सेवक, समन्वयक या सर्वांच्या समन्वयाने विविध कामांचे नियोजन करण्यात आले. आमदार पवार यांचे वैयक्तिक लक्ष आणि प्रांताधिकारी, दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार, बीडीओ, कृषी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या नियोजनामुळे दोन्ही तालुके 'रोहयो' कामांत आघाडीवर आहेत. रोहित पवार आमदार होण्यापूर्वी खर्चाच्या बाबतीत नाशिक विभागातील 54 तालुक्यांत खालून 5 वा क्रमांक असणारा जामखेड तालुका आता वरून 5 व्या क्रमांकावर, तर कर्जत तालुका 7 व्या क्रमांकावर आहे.

नागरिकाने रोजगाराची मागणी केल्यानंतर त्याला तत्काळ रोजगारही उपलब्ध करुन दिला जातो. शिवाय पंधरा दिवसात पैसेही अदा केले जातात. या योजनेच्या माध्यमातून शाळेला संरक्षक भिंत बांधणे, गायगोठा, शेळी पालनाचे शेड, कुक्कुटपालनाचे शेड, फळबाग, शेततळे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड, विहिरी, शोषखड्डे, घरकुल ही कामे झाली. त्यामध्ये जामखेड तालुक्यात 10.85 कोटी रुपये, तर कर्जत तालुक्यात 9.95 कोटी रूपयांची कामे झाली आहेत. अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीत पेव्हिंग ब्लॉक, रस्तेही करण्यात आले आहेत. आता ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीही बांधण्यात येणार आहेत.

रोहयोतून मागेल त्याला रोजगार उपलब्ध करण्याचा व अधिकाधिक सार्वजनिक, वैयक्तिक लाभाची कामे करण्याचा प्रयत्न आहे. प्रशासनाच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात कामे झाली. भविष्यातही प्रत्येक योजनेचा लोकांना फायदा होण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील.
                                                – रोहित पवार आमदार, कर्जत-जामखेड

पूर्ण झालेली कामे
शाळेला संरक्षक भिंत बांधणे – 35, गायगोठा – 1175, शेळीपालन शेड – 60, कुक्कुटपालन शेड – 24, फळबाग – 2180, शेततळे – 50, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड – 61, विहिरी – 130, शोषखड्डे – 1500, एकूण कामे – 5112.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT