अहमदनगर

नगर : आमदारांना एक कोटींची प्रतीक्षा ; जानेवारीपर्यंत 4 कोटी निधी उपलब्ध झाला

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे करण्यासाठी यंदाच्या 2022-23 च्या वर्षात प्रत्येक आमदारांना 5 कोटींचा विकास निधी मिळण्याची तरतूद झाली. पण एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक आमदारांना 4 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. उर्वरित 1 कोटींची रक्कम येत्या दीड महिन्यांत उपलब्ध होणार का? याची प्रतीक्षा आमदारांना लागून आहे. हा निधी मिळाला तर 70 कोटींच्या आमदार विकास निधीतून जिल्ह्यातील विविध विकासकामे मार्गी लागणार आहेत.

विधानसभा मतदारसंघातील विकास कामे मार्गी लागावीत, यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातंर्गत विधिमंडळाच्या प्रत्येक सदस्यांना निधी उपलब्ध केला जात आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक आमदारांना 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. 2021-22 वर्षातील 4 कोटींच्या निधीत 2022-23 मध्ये 1 कोटीने वाढ झाली. 31 मार्च 2023 पर्यंत जिल्ह्यात 70 कोटींची विकास कामे होणार आहेत.

जानेवारी महिन्यात प्रत्येक आमदारांना 40 लाख रुपये मंजूर झाले आहेत. विधानसभेचे 12 आणि विधान परिषेदचे दोन असे 14 आमदार जिल्ह्यात आहेत. विधानसभेच्या 12 आमदारांना प्रत्येकी 40 लाख, विधान परिषदेचे राम शिंदे यांना 40 लाख तर डॉ. सुधीर तांबे यांना 56 लाख 67 हजार रुपये मंजूर झाले. एकंदरीत जानेवारी महिन्यात एकूण 5 कोटी 76 लाख 67 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे.

SCROLL FOR NEXT