राहुरी, पुढारी वृत्तसेवा: लंपी आजाराने शेतकर्यांकडील एकाही जनावराचा उपचाराअभावी मृत्यू होणार नाही. सर्वच जनावरांचा या आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण पूर्ण करावे, अशा सक्त सूचना माजी राज्यमंत्री, आ. प्राजक्त तनपुरे यांनी केल्या.
आ. तनपुरे यांनी राहुरीतील पंचायत समितीच्या डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृहात सद्य परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी पशुवैद्यकीय अधिकार्यांना सूचना केल्या. या बैठकीत तालुक्यातील जनावरांची त्यांनी अधिकृत माहिती घेतली. सध्या चालू असलेल्या लसीकरणाबाबत पडताळणी करुन, महत्त्वाच्या सूचना केल्या. राहुरी तालुक्यात सुमारे 1 लाख जनावर संख्या आहे.
यापैकी 62 हजार 803 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी संबंधित पशुवैद्यकीय विभागाने अधिक वेगाने काम पूर्ण करावे. अडचणी असल्यास स्पष्टपणे निदर्शनास आणून द्याव्या. ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांशी संपर्क साधून लसीकरण राहिलेल्या जनावरांची माहिती घेतल्यास काम अधिक सुलभ होईल, असे सांगत लसीकरण मोहीम राबविताना अडथळे येणार आहेत. असे असले तरी विविध यंत्रणांचा उपयोग करून लसीकरण पूर्ण करावे. जनावरांचा मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्या, असे आ. तनपुरे यांनी स्पष्ट केले. तालुक्यात 130 जनावरांना लंपी आजाराची बाधा झाली होती. यापैकी 65 जनावरे आजारमुक्त झाली तर उर्वरित जनावरे प्रतिसाद देऊ लागली आहेत. तालुक्यात आजअखेर 6 जनावरांचा मृत्यू झाला. यात चेडगाव 2, मुसळवाडी 1, देवळाली प्रवरा 2, अंमळनेर 1 अशी संख्या आहे.