नगर : पुढारी वृत्तसेवा : रखडलेल्या महामार्गाचे काम सुरु व्हावे, या मागणीसाठी आमदार नीलेश लंके यांचे दुसर्या दिवशीही उपोषण सुरुच होते. रस्त्यांची कामे होत नसल्यास लोकप्रतिनिधी म्हणून राहण्यात अर्थच नाही. जोपर्यंत कामे सुरु होत नाही. तोपर्यंत जीव गेला तरी चालेल, मात्र, उपोषण सुरुच ठेवणार अशी भूमिका आमदार लंके यांनी व्यक्त केली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने आमदारांसह सहा उपोषणकर्त्याची आरोग्य तपासणी केली. सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी सादर केलेल्या माहितीतून समाधान झाले नसल्यामुळे चर्चा निष्फळ ठरली.
नगर-पाथर्डी-शेवगाव, नगर-राहुरी-कोपरगाव व नगर-मिरजगाव-टेभुर्णी या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. ही कामे तत्काळ सुरु करावी, या मागणीसाठी आमदार लंके यांच्यासह सहा जणांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. दुसर्या दिवशी गुरुवारी देखील उपोषण सुरुच होते. दिवसभरात विविध संघटना व कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणाला पाठिंबा दिला. यामध्ये माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक संजय झिंजे, सुनील काळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
माझी जनतेशी बांधिलकी
उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला आहे. परंतु अद्याप प्रशासनातील कोणी आले नाहीत. ते कोणाच्या दबावाखाली आहेत हे सांगू शकत नाही. बुधवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी भेटले. ज्या अधिकार्यांना दहा रुपये खर्चाचे अधिकार नाहीत. अशा अधिकार्यांबरोबर काय चर्चा करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आतापर्यंत आमचे कोणी सत्तेवर नव्हते. मुळात मी समाजकारण करणारा एक फकीर आहे. त्यामुळे माझी बाधिलकी जनतेशीच असणार आहे. त्यामुळे या आंदोलनात शेवट झाला तरी मला त्याची फिकीर नसल्याचे सांगत, आमदार लंके यांनी कामे सुरु झाल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिका कायम ठेवली
अधिकारच नाही, मग चर्चेला आले कशाला ?
उपोषणाच्या दुसर्या दिवशी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नीलेश पालवे व उपअभियंता स्मिता पवार यांनी भेट घेतली. रस्त्याच्या कामांसाठी किती निधी मंजूर आहे. आतापर्यंत किती काम झाले आणि किती शिल्लक आहे. यावर किती निधी खर्च झाला. तसेच कामास विलंब का, असे प्रश्न उपस्थित करीत आमदारांनी अधिकार्यांना निरुत्तर केले. ठेकेदारांमुळे रस्त्याचे काम रखडले असल्यास त्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल आमदारांनी उपस्थित केला. नाहीतर आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, असे आमदार लंके म्हणाताच, अधिकारी म्हणाले आम्हाला तो अधिकारच नाही. अधिकारच नाही मग चर्चा करण्यासाठी आलाच कशाला असे अधिकार्यांना त्यांनी सुनावले.