बोटा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणार्या आरोपीस पोलिसांनी अकोले (जाचकवाडी) येथून अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण वावी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या (सोनेवाडी ता. सिन्नर) येथील शेतमजुराच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले.
तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी जबरी अत्याचार केला असल्याची घटना 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान घडली होती. शेतमजूर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सदर गुन्ह्यातील आरोपी सचिन गोरख बर्डे (रा. सोनेवाडी ता. सिन्नर) याला जाचकवाडी तालुका अकोले येथून अटक करण्यात आली आहे.
आरोपी सचिन बर्डे हा गेली 9 महिन्यापासून पोलिसांना हुलकावणी देत होता. अखेर जाचकवाडी तालुका अकोले येथील त्याचे नातेवाईकांकडे आश्रय घेऊन राहत असल्याची खात्रीशीर माहिती नाशिक ग्रामीण वावी पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या खबरीनुसार वावी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर यांचे पथकाने जाचकवाडी गावचे पोलिस पाटील शिवाजी फापाळे यांचे मदतीने सापळा रचत गेली 9 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला त्याचे नातेवाईकांचे घरातून अटक केली आहे. पुढील कार्यवाहीसाठी त्याची वैद्यकीय तपासणी करत सिन्नर न्यायालयात हजर केले आहे.