संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे छायाचित्र असलेले फ्लेक्स बोर्ड फाडले म्हणून त्यांची जनतेच्या मनातून प्रतिमा कमी होणार नाही. मात्र यापुढे असे दहशतीचे राजकारण अजिबात चालणार नाही, असे सांगत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटीतपणे अन्यायाचा मुकाबला करावा, असा सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिला.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील चौफुलीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्यासह भाजप पदाधिकार्यांचे छायाचित्र असलेले विजया दशमीनिमित्त शुभेच्छांचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते. ते बोर्ड काँग्रेसच्या सरपंचासह चार जणांनी फाडले. त्यानंतर भाजप कार्यकर्ते रामदास दिघे यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर पालक मंत्री विखे पा. यांनी तळेगाव दिघे येथे भाजप कार्यकर्ते रामदास दिघे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी ते बोलत होते.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले की, दहशतीच्या राजकारणास अजिबात घाबरू नका. आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे तुम्ही संघटीतपणे मुकाबला करा. आम्ही तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, अशी ग्वाही ना. विखे पाटील यांनी यावेळी दिली. दरम्यान, फ्लेक्स बोर्ड फाडल्याबद्दल भारतीय जनता पार्टीने तळेगाव दिघे चौकात माजी उपसभापती नामदेव दिघे यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा घेण्यात आली. यावेळी तळेगाव सारख्या दुष्काळी भागाला वर्षानुवर्षे केवळ आश्वासने देऊन झुलवत ठेवल्याचे सांगत, निळवंडे धरणाचे श्रेय घेणारे भोजापूरच्या पाणी प्रश्नावर काहीच बोलायला तयार नाहीत. केवळ ठेकेदारांच्या जिवावर राजकारण करीत ते फक्त दहशत निर्माण करतात, असा आरोप भाजप माजी सरपंच भीमराज चत्तर व भाजप उपाध्यक्ष संदीप देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केला.
यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीशराव कानवडे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शैलेश फटांगरे, अमोल खताळ, शरद गोर्डे, बाबा आहेर आदी उपस्थित होते.