अहमदनगर

राहुरी : शेतकर्‍यांनो, के. के. रेंजची भीती बाळगू नका : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा

अमृता चौगुले

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांनी के. के. रेंजची भिती मनात बाळगू नये. के. के. रेंजबाबत तोडगा काढण्यासाठी प्रवरा परिसरात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दौर्‍यावेळी शेतकर्‍यांना मोठा दिलासा देण्यास कटिबद्ध आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करुन, देशाचे नाव जगात उज्ज्वल करण्यासाठी पंतप्रधान मोदी शासनाने उचललेले पाऊल लोकहितकारक ठरत आहे. विरोधकांचा सुपडासाफ होऊन भाजप हाच पक्ष आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेत विराजमान होणार असल्याचा दावा महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी येथे केला.

राहुरी नगरपरिषदेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभिमान राज्यस्तरांतर्गत राहुरी शहरी गटार योजनेला 134 कोटी 98 लाख रुपयांचा पहिला टप्पा मंजूर झाला. यापैकी 92 कोटी 98 लाख रुपये मंजूर झाले. या कामाचा शुभारंभ दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता राहुरी येथील नवी पेठ येथे महसूल व पालक मंत्री विखे पा. यांच्या हस्ते तर जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली, खा. डॉ. सुजय विखे पा., जि. प. बांधकामचे माजी चेअरमन, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील, कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ढोकणे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदींच्या उपस्थितीत पार पडला.

पालकमंत्री विखे पा. यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विकासात्मक योजनांचा यावेळी उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांच्या उज्ज्वल नेतृत्वामुळे देशाचा जगात डंका आहे. चंद्रयान मोहिम यशस्वीतेने देशाने जगाचे लक्ष वेधले. कांद्याला आतापर्यंत सर्वाधिक 2,410 रूपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. सहकाराला बळकटी देण्यासाठी साखर कारखान्यांना करामध्ये सवलत देण्यात आली. शेतकर्‍यांना केवळ 1 रूपयात पीक विमा देण्यात आला, असे सांगत शेतकर्‍यांच्या हितासाठी राबणारे केंद्र व राज्य शासनाचे निर्णय विकासात्मक ठरत आहेत. दुष्काळाची जाणीव असल्याने शेतकर्‍यांना पाण्याची कमतरता भासू देणार नाही. मुळातून 1 सप्टेंबरला उजव्या कालव्याचे आवर्तन शेतकर्‍यांसाठी सोडणार आहे, असे मंत्री विखे पा. यांनी सांगितले.

खा. डॉ. सुजय विखे म्हणाले, राहुरीला विकास काय असतो हे दाखवून देण्यास आम्ही प्रयत्न करीत आहोत. लवकरच शहरात शासकीय कार्यालय एकाच छताखाली आणण्यास शासनाची 11 हेक्टर जमीन देणार आहोत. महसूल, पोलिस, शासकीय रुग्णालय, वन विभाग आदी सर्व कार्यालये 5 एकरामध्ये येणार आहेत. ज्यांना घरकूल बांधण्यास जागा नाही त्या कुटुंबियांना अर्धा गुंठा जागा दिली जाणार आहे. आताच्या शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी व्यापारी संकूल उभारुन राहुरी शहराची आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. राहुरीची सत्ता ज्यांच्याकडे दिली त्या कुटुंबाने शहरासह तालुक्याच्या विकासास काहीच योगदान दिले नाही, असा टोला खा. त्यांनी लगावला.

आता आम्ही भाजप पक्षाच्या माध्यमातून राहुरी परिसराचे नंदनवन करू. के. के. रेंजबाबत खासदारकी पणाला लावेल. केंद्राकडून के. के. रेंजचा विषय संपुष्टात आणू, अशी ग्वाही खा. विखे यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे कुटुंबियांवर चौफेर हल्ला चढविला. राहुरीकरांनी भावनेच्या भरात तनपुरेंना आमदारकी दिली. त्यांना विकासासाठी मंत्रीपद मिळाले, परंतु मंत्रीपदाचा उपयोग जनतेसाठी नव्हे तर स्वतःच्या उद्धारासाठी केला. परिणामी राहुरी मतदार संघात एकही समस्या मार्गी लागली नाही. मी आमदार असताना ग्रामीण रुग्णालयाला निधी आणला, परंतु पालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून शहरात नाहरकत दाखला अडविल्याने मिळालेला निधी परत गेल्याचे पाप तनपुरे कुटुंबियांचे आहे, अशी टीका त्यांनी केली.

देशासह राज्यात सत्ता आमची आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या विकास कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न तनपुरेंनी करू नये, असे सांगत पुढील खासदार डॉ. विखे हेच असणार आहेत, असे कर्डिले यांनी ठणकावून सांगितले. अ‍ॅड. सुभाष पाटील म्हणाले, राहुरीत मंत्री विखे, खा. डॉ. विखे व माजी मंत्री कर्डिले यांची जंगी मिरवणूक ही आगामी विकासाची चाहूल आहे. यावेळी विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी भूमीगत गटार योजनेची माहिती दिली.

यावेळी आर. आर. तनपुरे, दादा पा. सोनवणे, शामराव निमसे, सुरसिंगराव पवार, दत्तात्रेय ढुस, कारभारी डौले, चांगदेव भोंगळ, अतिक बागवान, गणेश खैरे, अण्णा शेटे, नयन शिंगी, सोन्याबापू जगधने, अ‍ॅड. संदीप भोंगळ, नारायण धोंगडे, भाजप व विकास मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आभार डॉ. धनंजय मेहत्रे यांनी माणले.

वाळू तस्करांच्या मुस्कटदाबीने गुन्हेगारी घटली..!

महसूल विभागाच्या सुधारित वाळू धोरणामुळे वाळू तस्करांची चांगलीच गोची झाली. वाळू तस्करांमुळे गुन्हेगारी वाढली होती, परंतु जिल्ह्यात वाळू तस्करांची मुस्कटदाबी झाल्याने गुन्हेगारी घटल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी ठणकावून सांगितले.

रावसाहेब चाचा तनपुरेंनी भाजपात प्रवेश करावा

मंत्री राधाकृष्ण विखे पा. म्हणाले, रावसाहेब चाचा तनपुरे यांचा भाजप प्रवेश झाला नाही. आता कोणतीही वाट पाहू नका. यापुढे सर्व निवडणुका भाजपच्या चिन्हावर होणार असल्याने चाचा तनपुरे यांनी भाजपात प्रवेश करावा, असे आवाहन मंत्री विखे यांनी केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT