अहमदनगर

नगर : ‘त्यांच्या’वर गोमूत्र शिंपडण्याची गरज : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  स्वर्गीय बाळासहेब ठाकरे यांना ज्या शक्तीने शिव्या शाप दिला, त्याच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हिंदुत्ववादी विचाराशी प्रतारणा करीत आघाडी करणारे जे कोणी आहेत. त्यांच्यावरच खर्‍या अर्थाने गोमूत्र शिंपडले पाहिजे, अशी टीका केंद्रीय रेल्वे व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस आघाडीबरोबरच शिवसेनेवर केली. नगर ते आष्टी या रेल्वे मार्गाच्या शुभारंभासाठी राज्यमंत्री दानवे गुरुवारी नगरला आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे विचाराने कोणा एका कुटुंबाचे वारस ठरु शकत नाहीत. त्यांच्या विचारांचे बुहुतांश वारस आहेत. मात्र, त्यांच्या संपत्तीचे काही जण वारस आहेत. संपत्तीचे वारस हे विचारांचे वारस असतीलच असे नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

गुरुवारी त्यांचा स्मृतिदिन होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर काहींनी त्या ठिकाणी गोममुत्र शिपडून शुध्दीकरण केले. याकडे राज्यमंत्री दानवे यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना शिव्या शाप दिले. त्या नेत्यांबरोबर म्हणजेच महाविकास आघाडीबरोबर शिवसेनेने सरकार स्थापन केले. त्यामुळे त्यांच्यावरच खर्‍या अर्थाने गोमूत्र शिंपडण्याची गरज होती, अशी टीका दानवे यांनी शिवसेनेवर केली. त्यांचा हिंदुत्वाचा प्रखर विचार पुढे नेण्याचे काम भाजप व मुख्यमंत्री करीत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, राज्यमंत्री दानवे म्हणाले की, ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान माहीत नाही, ज्यांना सावरकर माहिती नाहीत.
त्यांचा स्वातंत्र्यासाठी असलेला त्याग, तपस्या माहित नाहीत, अशा व्यक्तींनी स्वातंत्रवीर सावरकरांवर बोलणे योग्य नाही, अशी टीका त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

त्यांनी इंग्रजांची माफी मागितली असती तर त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली नसती. ते शेवटपर्यंत इंग्रजांना शरण गेले नाहीत. त्यामुळे उगाचच सावरकरांवर टीका करु नये, असा सल्ला राज्यमंत्री दानवे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार डॉ. प्रितम मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT