अहमदनगर

नगर : मिनी मंत्रालय दुसर्‍या दिवशीही ठप्पच!

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी जुन्या पेन्शनसाठी मंगळवारपासून पुकारलेल्या काम बंद आंदोलनबाबत शासनाकडून तोडगा न निघाल्याने काल बुधवारी दुसर्‍या दिवशीही संप सुरूच होता. दरम्यान, जिल्हा परिषद आवारात कर्मचार्‍यांनी शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या पत्रकाची होळी करून शिमगा घातला. तसेच यावेळी आऊटसोर्सिंग भरतीबाबतही तीव्र संताप व्यक्त केला. संपूर्ण राज्यभरात जुन्या पेन्शनचा लढा तीव्र झाला आहे. जिल्हा परिषदेचेही 14600 कर्मचारी या संपात उतरलेले आहेत.

त्यामुळे मुख्यालयासह 3500 शाळांनाही अघोषित सुट्या लागल्याचे चित्र आहे. या संपात सहभागी कर्मचार्‍यांना नोटिसा बजावल्या जात असतानाही, हा संप तीव्र बनताना दिसत आहे. काल बुधवारी संपाचा दुसरा दिवस होता. सकाळी कार्यालयीन वेळेत कर्मचारी आले, मात्र कार्यालयात गेले नाहीत. ते मुख्य प्रवेशद्वाराजवळील मंडपामध्ये थांबले होते. यावेळी एकच मिशन, जुनी पेन्शनच्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी कर्मचारी नेते शिवाजी भिटे, सुभाष कराळे, विकास साळुंखे आदींनी मार्गदर्शन केले.

कर्मचार्‍यांनी घाबरून जाऊ नये, यश जवळ आहे, अशा शब्दात संपाला ऊर्जा दिली. तर अन्य कर्मचार्‍यांनीही आक्रमक भाषणे करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या वेळी शासनाने जुन्या पेन्शनबाबत अहवाल देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या पत्रकाची कर्मचार्‍यांनी होळी करत हा तोडगा अमान्य केला. याप्रसंगी कल्पना शिंदे, सोनाली लेंडकर, अर्चना रासकर, रजनी जाधव, विजय कोरडे, विलास वाघ, संदीप वाघमारे, शशिकांत रासकर, संतोष लंके, मनोज चोभे, सागर आगरकर, नीलेश गाडेकर, संजय बनसोडे आदी कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, मार्चअखेर जवळ आहे. 2021-22 मधील अखर्चित निधी 31 मार्चपर्यंत खर्च न झाल्यास तो शासन तिजोरीत मागे द्यावा लागणार आहे. अशा वेळी कर्मचारी संपावर गेल्याने याचा अर्थ विभागावरही परिणाम पाहायला मिळाला. जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र व राज्याने घेतला आहे. तो डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा सीईओंचा संकल्प असताना, जलजीवन विभागातही काल खुर्च्या रिकाम्याच दिसल्या.

आरोग्य विभागात शुकशुकाट!
जिल्ह्यात एन्फ्लुएंझाचा पहिला रुग्ण आढळला असताना, आरोग्य विभागात काल दुसर्‍या दिवशीही शुकशुकाट पाहायला मिळाला. आरोग्य विभागात 42 कर्मचार्‍यांची नियुक्ती आहे, मात्र या संपात 41 कर्मचार्‍यांनी सहभाग घेतल्याची आकडेवारी प्रशासनाकडून मिळाली.

विभागप्रमुखांचा चहापाणी बंद!
सर्वच कर्मचारी संपावर गेल्याने विभागप्रमुखांचीही अडचण निर्माण झाली आहे. पाणी, चहा बंदच झाला आहे. त्यामुळे सकाळी 11 पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन उपमुख्य अधिकारी यांच्या दालनाचे दरवाजेही बंद असल्याचे कर्मचार्‍यांनी निदर्शनास आणले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT