अहमदनगर

सिध्दटेक : गणरायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला

अमृता चौगुले

सिध्दटेक : पुढारी वृत्तसेवा :  येथे नवीन वर्षातील पहिली आणि शेवटची अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनाला देशभरातील भाविकांनी पहाटेपासून प्रंचड गर्दी केली होती. अंदाजे एक ते दिड लाख भाविकांनी दिवसभरात दर्शन घेतले, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली. वर्षातून दोनदा येणारा हा अतिशय पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी उपवास केल्यास एकवीस संकष्टी केल्याचा लाभ व पुण्य मिळते म्हणून देशातील कानाकोपर्‍यातील गणेश भक्त या दिवशी न चुकता येतात.

मंदिराच्या गाभार्‍यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पंरिसरातील महिलांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. गणेशभक्तांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून देवस्थान, प्रशासन, पोलिस कर्मचारी व ग्रामपंचायतीने चांगली व्यावस्था केली होती. यावेळी प्रशासनाने पूर्ण लक्ष दिल्याने पार्किंग व्यवस्थेचे चांगले नियोजन झाले. त्यामुळे मंदिरासमोरील जागा रिकामी ठेवल्याने वाहतूक व भक्तांची कोंडी झाली नाही. एका बाजुने मंदिरात प्रवेश करून दुसर्‍या बाजुने बाहेर सोडण्यात आल्याने भाविकांना त्रास झाला नाही. त्यांना दर्शन घेण्यास सुलभता आली. प्रदक्षिणा मार्गावर वीजेची सोय झाल्याने प्रदक्षिणा मारताना त्रास झाला नाही. यावेळी प्रशासनाच्या मदतीला अनिरुध्द महाराज अ‍ॅकॅडमीचे स्वंयसेवक, पोलिस मित्र, सक्सेस सेक्युरिटेचे जवान, देवस्थानचे कर्मचारी असल्याने मोठ्या गर्दीचे नियोजन करता आले.

रस्ते वाहनांनी हाऊसफुल्ल

सिध्दटेकला जोडणारे दौंड, बारामती, श्रीगोंदा, कर्जत रस्ते वाहन व भक्तांच्या गर्दीने पहाटेपासून फुलून गेले होते. यावेळी मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर बाहेरील दुकानांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने भाविकांची त्यातून मार्ग काढताना तांराबळ उडाली. सिद्धटेक विकास आराखड्याप्रमाणे सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशी अपेक्षा सर्व गणेशभक्त व्यक्त करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT