अहमदनगर

नगर : अकोले तालुक्यात लिंगदेवला साकारणार एमआयडीसी..!

अमृता चौगुले

अकोले : पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत मंत्रालयात आ. किरण लहामटे यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. दरम्यान, मंत्रालयीन अधिकारी स्वतः शनिवारी लिंगदेव येथे जागेची पाहणी करणार असल्याने अकोले तालुक्यात भविष्यात एमआयडीसी उभी राहण्याचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र दिसत आहे. अकोले तालुक्यात आ. डॉ . लहामटे यांनी निवडणूक काळात एमआयडीसी उभारण्यासंदर्भात जनतेला शब्द दिला होता.

लिंगदेव परिसरात एमआयडीसी संबंधात किती जागा उपलब्ध होऊ शकते. या जागेची पाहणी काही महिन्यांपुर्वी तहसीलदार व तलाठ्यासोबत करण्यात आली होती. ज्या गावात जागा उपलब्ध होऊन गावच्या ग्रामस्थांची मदत होईल तेथे एमआयडीसी उभी राहिल, असे आ. डॉ. लहामटे यांनी सांगितले होते, मात्र लिंगदेव गावातुन जागा उपलब्ध झाली तर नक्कीच एमआयडीसी उभी राहु शकते, अशी मागणी नागरिकांमधुन पुढे आल्यावर संबंधित जागेचे प्रस्ताव ग्रामपंचायतीकडुन उपलब्ध केले.

जागेचे कागदपत्र तहसीलदार व कामगार तलाठी यांनी लोकप्रतिनिधींकडे देण्यात आले. अनेकांना आ. डॉ. लहामटे म्हणत असे कि, अजित दादांनी मला एमआयडीसी उभी करण्याचा शब्द दिला आहे. अकोले तालुक्यात एमआयडीसी उभी केल्याशिवाय व तरुणांना रोजगार मिळुन दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. या पार्श्वभूमीवर उपमुख्य मंत्री अजित पवारांसोबत आ. डॉ. लहामटे गेले आहेत. मी विकासासाठी अजित पवार यांच्यासोबत गेल्याचे डॉ. लहामटेंनी जाहीररीत्या सांगितले. याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत मंत्रालयात आ.डॉ. लहामटेंची बैठक झाली. यावेळी अजित पवार व उदय सामंत यांनी एमआयडीसी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत शनिवारी औद्योगिकचे अधिकारी लिंगदेव येथे एमआयडीसीबाबत जागेची पाहणी करणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

अकोले तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत तसेंच औद्योगिक वसाहत विभागाच्या अधिका-यासमवेत मंत्रालयात माझ्या उपस्थितील बैठकीत एमआयडीसी बाबत सकारात्मक चर्चा होत संबंधित विभागाचे अधिकारी स्वतः शनिवारी लिंगदेव येथे जागेची पाहणी करणार आहेत.

SCROLL FOR NEXT