देवदैठण : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील माठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मात्र, सदस्य पदासाठीच्या नऊ पैकी तीन जागा बिनविरोध झाल्याने निवडणूक बिनविरोधच्या मार्गावर आहे. येळपणे गटातील एकमेव माठ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी तीन प्रभागांत एकूण नऊ जागा व सरपंच पद अशा 10 जागांसाठी होणार्या निवडणुकीसाठी 22 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
जनतेतून असणारे सरपंचपद हे अनुसूचित जमाती व्यक्तीसाठी आरक्षित असून त्यासाठी अरुणा विश्वनाथ पवार आणि किरण गुलाब पवार या दोघांनी एकमेकांसमोर अर्ज भरून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. सदस्य पदासाठी प्रभाग 1 मध्ये 3 जागांसाठी 9, प्रभाग 2 मध्ये 3 जागांसाठी 8 आणि प्रभाग 3 मध्ये 3 जागांसाठी 3 अशा 20 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. यात प्रभाग 3 मध्ये सर्वसाधारण पुरुष जागेसाठी मच्छिंद्र घेगडे तर सर्वसाधारण महिलेसाठी रुपाली देवीकर व माधुरी घेगडे यांचे अर्ज असल्याने या तिघांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरपंचपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून सरपंचपदासाठी अधीर झालेल्या इच्छूक भावी गाव कारभार्यांच्या स्वप्नावर मात्र पाणी फेरले आहे.
माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप व नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे या तीनही गटाकडे प्रत्येकी 3-3 सदस्यांच्या जागा घेऊन सर्वानुमते सरपंचपदाची निवड करणे असे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या निवडणूक बिनविरोध करण्याच्या बैठकीत ठरले होते. त्यामुळे आता ठरल्याप्रमाणे होऊन निवडणूक बिनविरोध होतेय का, याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.