वाळकी : पुढारी वृत्तसेवा : सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची राज्य सहकार प्राधिकरणने केलेली विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मान्य केली आहे. बाजार समित्यांच्या निवडणुका दि.15 मार्च 2023 पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यभरातील बाजार समित्यांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. नगर तालुका बाजार समितीसह जिल्ह्यातील, तसेच राज्यभरातील बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या दि.14 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
त्यावर 23 नोव्हेंबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या व दि.2 डिसेंबरपर्यंत त्यावर निर्णय देण्यात आला. आता अंतिम मतदार याद्या दि.7 डिसेंबरला प्रसिद्ध होऊन, दि.23 डिसेंबरपासून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरु होणार होता. या निवडणुकांसाठी दि.29 जानेवारी 2023 रोजी मतदान आणि 30 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र, या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्य शासनाने बाजार समिती कायद्यात बदल करून शेतकर्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे.त्याबाबत अभ्यास करून निवडणूक प्रक्रियेत दुरुस्त्या करण्यासाठी वेळ मिळावा, तसेच सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरु असून, नवीन निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सहकार प्राधिकरणने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकेद्वारे केली होती.
त्यावर खंडपीठाने नुकताच निर्णय देत बाजार समित्यांच्या निवडणुका दि.15 मार्च 2023 पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना संकटापासून लांबणीवर पडत असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांना सप्टेंबर 2022 मध्ये मुहूर्त लागला होता. राज्य सहकार प्राधिकरणाने राज्यातील 31 डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र असलेल्या 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.
त्यामुळे लांबलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2022 च्या पत्रान्वये राज्यातील एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केल्याप्रमाणे बाजार समितीच्या निवडणुका घेतल्यास, सध्या जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार नवीन निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित राहतील.
त्यामुळे ग्रामपंचायतीचे नवीन निवडून येणारे सदस्य बाजार समितीच्या मतदारयादीत समाविष्ट करून, मतदारयादी अंतिम होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यास परवानगी देण्याची मागणी राज्य सहकार प्राधिकरणने खंडपीठाला केली होती. ती मान्य करत न्या. मंगेश पाटील व न्या. वाय.जी. खोब्रागडे यांच्या खंडपीठाने बाजार समित्यांच्या निवडणुका दि.15 मार्च 2023 पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्याबाबत राज्य सहकारी प्राधिकरणाने काही कळविलेले नाही. त्यामुळे अहमदनगर, श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामगेड व कर्जत बाजार समित्यांची अंतिम मतदार यादी बुधवारी प्रसिध्द करीत असल्याचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सांगितले