अहमदनगर

नगरमध्ये मक्याच्या शेतात गांजाचे आंतरपीक

अमृता चौगुले

शेवगाव तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील बाडगव्हाण येथे एका शेतकर्‍याच्या मक्याच्या शेतात गांजाचे आंतरपीक घेतल्याचे मंगळवारी (दि.9) सायंकाळी उघड झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या व शेवगाव पोलिसांच्या पथकाने सुमारे अडीच लाख रुपये किमतीची पन्नास किलो वजनाची 335 हिरवी झाडे शेतातून जप्त केली व गुन्हा दाखल करून शेतकरी अशोक सुदाम काजळे (वय 46) याला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशाने उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहायक फौजदार विष्णू घोडेचोर, पोलिस कॉन्स्टेबल किशोर शिरसाठ, शिवाजी ढाकणे, पोलिस नाईक भाग्यश्री भिटे, चालक पोलिस नाईक बबन बेरड यांचे पथक शेवगाव तालुक्यात अवैध व्यवसायांवर कारवाईसाठी आले होते.

त्यांना बाडगव्हाण येथील गांजाच्या झाडांची माहिती मिळाली. या पथकाने शेवगावचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना ही माहिती दिली. पुजारी यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल परशुराम नाकाडे, बप्पासाहेब धाकतोडे यांचे पथक वजन मापे निरीक्षक व दोन शासकीय पंचांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीला गेले. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास दोन्ही पथकांनी मिळून बाडगव्हाण येथील संबंधित शेतात छापा टाकला. तेथे मक्याच्या पिकात 50 किलो 100 ग्रॅम वजनाची 2 लाख 50 हजार 500 रुपये किमतीची गांजाची लहान-मोठी हिरवी 335 झाडे जप्त केली. पोलिस नाईक संतोष शंकर लोढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित शेती काजळेच्या आईच्या नावावर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT