अहमदनगर

जरांगेंच्या स्वागतासाठी लाखो नगरकर रस्त्यावर

दिनेश चोरगे

नगर; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे पायी मोर्चाने निघालेले मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी लाखो नगरकर रस्त्यावर उतरले. रस्त्याने ठिकठिकाणी विविध पदार्थांचा नाश्ता तसेच पाण्याच्या बाटल्यांचे स्टॉल लावून नगरकरांनी मोर्चेकर्‍यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अंतरवाली सराटी येथून जरांगे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मराठा आरक्षण मोर्चा रविवारी दुपारी नगर जिल्ह्यात दाखल झाला. बाराबाभळी येथील मदरशामध्ये आणि त्यासमोरच्या दीडशे एकर जागेवर मुक्कामाची आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. अनेक मोर्चेकरी उघड्यावरच राहुट्या टाकून झोपल्याचे दिसून आले.

बाराबाभळी येथील मदरसा परिसरात टेम्पो, ट्रॅक्टर, छोटी-मोठी वाहने, राहुट्या, त्यावर लावलेल्या भगव्या पताका आणि झेंडे, असे भारलेले भगवेमय वातावरण होते. मदरशावरही भगवा ध्वज लावून, 'तुमच्यासाठी हा लढा आमचाही आहे,' असा संदेश मुस्लिम बांधवांनी दिला. सकाळी दहाच्या सुमारास मोर्चा पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला. ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, जीपसारखी शेकडो वाहने पुढे, त्यामागे पायी मोर्चा आणि त्यामागेही शेकडो वाहने, असा माहोल असलेल्या मोर्चात हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत.

जरांगे यांच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. मोर्चा नगरहून पुढे रवाना होत असताना लाखो नगरकर महिला-पुरुष रस्त्यावर उतरले. अनेकांनी जरांगे यांचे स्वागत केले. सर्वांना अभिवादन करत जरांगे चालत होते. काही वेळ जीपच्या टपावर बसून ते मार्ग पार करताना दिसले. मोर्चाभोवती सुमारे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त होता.

SCROLL FOR NEXT