अहमदनगर

मराठा समाज धनगर बांधवांच्या पाठीशी मनोज जरांगे पाटील; दसर्‍याची शपथ घ्या, घराघरात जा

backup backup

नगर : पुढारी वृत्तसेवा : धनगर-मराठा समाजाचं दु:ख एकच आहे. दसर्‍याला शपथ घ्या. घराघरात जा. राजकारणविरहीत घराघरात जागृती करा, एकत्र या. लाट उसळली तर कोणीच शक्ती रोखू शकत नाही. आरक्षण कसं मिळत नाही ते पाहू, असे सांगतानाच मराठा समाज पाठीशी असल्याचे आश्वासनही मनोज जरांगे पाटील यांनी धनगर बांधवांना दिले.

नगर जिल्ह्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले,मनावर घेतलं तर पदरात आरक्षण पडलंच समजा. फक्त धनगर बांधवांनी मनावर घेतले पाहिजे. स्वत:च्या वाट्याला आलेले कष्ट मुलांच्या वाट्याला येऊ नयेत, असे स्वप्न आई-वडील पाहतात; मात्र आरक्षण नसल्याने त्यांचा स्वप्नभंग होतं. मराठा आणि धनगर समाजातील प्रत्येकाच्या आई-वडिलांची हीच स्थिती आहे. मराठा समाजाला 40 दिवसांचं आश्वासन दिलं. धनगर समाजाला 50 दिवसांचं दिलं. मराठा समाजाला दिलेलं आश्वासन संपत आलंय. अजून काही निर्णय नाही. त्यामुळे तुम्ही 50 दिवसांची वाट पाहू नका. आमचे पाहून शहाणे व्हा. घराघरात जागृती करा. घराघरातून समाज पेटून उठला पाहिजे. आरक्षण मिळायला वेळ लागणार नाही. धनगर समाजाने संधीचे सोने केले पाहिजे, असे आवाहन करतानाच जरांगे पाटील यांनी उठाव केल्याशिवाय न्याय मिळत नसल्याचे सांगितले.

दसर्‍याला शपथ घ्या. उद्यापासूनच कामाला लागा. तेव्हा कुठं सरकार 50 दिवसांत ठिकाणावर येईल. आमचे पाहून शहाणे व्हा, असा सल्ला जरांगे पाटील यांनी दिला. हे आपले नाही, आपण त्यांचे नाही. आरक्षण आंदोलनातून चीड, वेदना बाहेर पडत असल्याचेही ते म्हणाले.

आरक्षण मिळाल्याशिवाय सोडणार नाही

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय सोडणार नाही. अनेकांनी अनेक डाव टाकले, पण सगळे उलटून लावले. दगाफटका करू शकलो असतो, पण गद्दारी करणारी आमची औलाद नाही, जातीशी प्रामाणिक आहे. आता शांततेचं युद्ध सुरू आहे. अगोदरच सांगून ठेवलं आहे, पेलणार नाही आणि झेपणारही नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय सुट्टी नाही!

 हेही वाचा

SCROLL FOR NEXT